Join us  

सीतेच्या भूमिकेसाठी भरमसाठ मानधन मागितल्यामुळे ट्रोल झाली होती करीना कपूर, आता म्हणतेय...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 12:08 PM

करीना कपूर सीतेच्या भूमिकेमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. तिने या भूमिकेसाठी भरमसाठ फीची मागणी केल्याचे वृत्त होते.

बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. कधी तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे तर कधी ग्लॅमरस फोटोंमुळे. गेल्या अनेक दिवसांपासून करीना एका चित्रपटातील सीतेच्या भूमिकेसाठी मानधन वाढवण्याच्या मागणीवरून चर्चेत आली आहे. वृत्तानुसार, तिने सीतेच्या भूमिकेसाठी भरमसाठ मानधन मागितले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, करीना कपूरने चित्रपटातील सीतेच्या भूमिकेसाठी १२ कोटी रुपयांची मागणी केली होती आणि तिच्या या मागणीनंतर निर्माते आता तिच्या निर्णयावर पुनर्विचार करत आहेत. सोशल मीडियावर करीनाला या मागणीसाठी खूप ट्रोल करण्यात आले होते. इतकेच नाही तर ती या भूमिकेसाठी योग्य नसल्याचेही नेटकऱ्यांनी म्हटले होते. 

दरम्यान आता करीना कपूरने या प्रकरणावर मौन सोडले आहे. तिने म्हटले की, काही वर्षांपूर्वी चित्रपटात पुरुष किंवा स्त्रीला समान मानधन मिळण्याविषयी कोणीही बोलत नव्हते. मात्र आता आपल्यापैकी बरेच जण याबद्दल उघडपणे बोलत आहेत.

पुढे ती म्हणाली की, मला काय हवे आहे ते मला सांगायचे आहे आणि मला असे वाटते की, महिलांना आदर मिळाला पाहिजे. हे मागणी करण्याबद्दल नाही, ते महिलांच्या सन्मानाबद्दल आहे आणि मला वाटते की, गोष्टी बदलल्या पाहिजेत.

करीना कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती आमिर खानसोबत लाल सिंग चड्ढा चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती करण जोहरच्या तख्त या चित्रपटातदेखील काम करताना दिसणार आहे. 

टॅग्स :करिना कपूरआमिर खान