काबील या चित्रपटातील हृतिक रोशनच्या भूमिकेचे करण जोहरने केले कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 17:29 IST
मोहेंजोदडो हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर हृतिक रोशनला एका हिटची गरज होती आणि तो हिट त्याला आता काबिल हा चित्रपट ...
काबील या चित्रपटातील हृतिक रोशनच्या भूमिकेचे करण जोहरने केले कौतुक
मोहेंजोदडो हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर हृतिक रोशनला एका हिटची गरज होती आणि तो हिट त्याला आता काबिल हा चित्रपट मिळवून देणार आहे यात काही शंकाच नाही. हृतिक गेल्या कित्येक महिन्यांपासून काबिल या त्याच्या चित्रपटावर काम करत आहे. हृतिकने कहो ना प्यार है या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली. त्याच्या या पहिल्या चित्रपटाची निर्मिती त्याचे वडील राकेश रोशनने केली होती. त्यानंतर राकेश रोशन आणि हृतिक यांच्या जोडीचे क्रिश, कहो ना प्यार है यांसारखे अनेक चित्रपट गाजले. हृतिक आणि राकेश यांच्या जोडीचा काबिल हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात हृतिक एका अंधाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून त्याच्या अभिनयाचे कौतुक समीक्षक आणि प्रेक्षक दोघेही करत आहेत. आता त्याच्या या चित्रपटातील अभिनयाच्या प्रेमात दिग्दर्शक-निर्माता करण जोहर पडला आहे. काबिल या चित्रपटातील हृतिकचा परफॉर्मन्स हा त्याचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स असल्याचे करणचे म्हणणे आहे. करणने ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटवर ट्वीट करून हृतिकचे अभिनंदन केले आहे. करणने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, एक निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून तुम्ही जेव्हा एखादा कलाकार त्याचा सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स चित्रपटात देत आहे हे जेव्हा पाहाता त्यावेळी तुम्हाला अत्यानंद होतो. हृतिकने काबिलमध्ये अतिशय सुंदर काम केले आहे.हृतिकने करण जोहरसोबत अनेक वर्षांपूर्वी काम केले होते. हृतिकने कारकिर्दीच्या सुरुवातीला करणने दिग्दर्शित केलेल्या कभी खुशी कभी गम या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याने साकारलेल्या रोहन या भूमिकेचे आजही प्रेक्षक कौतुक करतात.