Join us  

कनिका कपूरची तिसऱ्यांदा करण्यात आली कोरोनाची टेस्ट, वाचा काय आले रिपॉर्टमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 2:29 PM

कनिकाची आता तिसऱ्यांदा कोरोना व्हायरसची चाचणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकनिकाची कोरोना व्हायरसची तिसरी चाचणी देखील पॉझिटिव्ह आली असून लखनऊमधील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत.

कनिका कपूरचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ते रिपोर्ट कनिकाचेच आहेत का असा प्रश्न तिच्या घरातल्यांना पडला होता. कारण या रिपोर्टमध्ये मुलगीऐवजी मुलगा असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे तिची कोरोनाची चाचणी पुन्हा एकदा करण्यात आली होती. या चाचणीत देखील तिला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले होते. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून कनिकाची आता तिसऱ्यांदा कोरोना व्हायरसची चाचणी करण्यात आली आहे.

कनिकाची कोरोना व्हायरसची तिसरी चाचणी देखील पॉझिटिव्ह आली असून लखनऊमधील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे डायरेक्टर आर.के. धिमान यांनी मीडियाशी बोलताना सांगितले आहे की, कनिकाचे दोन रिपोर्ट जोपर्यंत निगेटिव्ह येत नाहीत, तोपर्यंत तिच्यावर उपचार सुरूच राहाणार आहेत. 

कनिकाने इन्स्टाग्रामवर काही दिवसापूर्वी एक पोस्ट लिहिली होती आणि त्यात म्हटले होते की, गेल्या चार दिवसांपासून मला ताप येत असल्याने मी कोरोनाची टेस्ट केली असून ती पॉझिटिव्ह आली आहे. मी आणि माझे कुटुंब सध्या सगळ्यांपासून पूर्णपणे वेगळे राहात असून डॉक्टरांनी दिलेला सल्ला ऐकत आहोत. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांची देखील तपासणी केली जाईल. दहा दिवसांपूर्वी परदेशातून परतल्यावर विमानतळावर माझे स्कॅनिंग करण्यात आले होते. पण त्यावेळी कोणतीही लक्षणं आढळली नाहीत. मी घरी येऊन दहा दिवस झाले असून गेल्या चार दिवसांपासून माझ्या शरीरात कोरोनाची लक्षणं जाणवत आहेत.

तिने या पोस्टमध्ये पुढे लिहिले होते की, मी सगळ्यांना विनंती करते की, तुमच्या शरीरात कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळल्यास तुमची टेस्ट करून घ्या आणि सगळ्यांपासून काही दिवस वेगळे राहा.. सुजाण नागरिकाप्रमाणे स्वतःची आणि इतरांची देखील काळजी घ्या... माझी तब्येत आता बरी असून केवळ मला थोडासा ताप आणि सर्दी आहे.

  

टॅग्स :कनिका कपूरकोरोना वायरस बातम्या