Join us  

मला अनफॉलो का केलं जातय? फॉलोअर्स कमी होत असल्याने कंगना झाली अस्वस्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 3:43 PM

दिवसाला 40 ते 50 हजार फॉलोअर्स करतायत अनफॉलो...म्हणे, हा एक पॅटर्न...

ठळक मुद्देआपल्या दुस-या ट्विटमध्ये हे खूप मोठे रॅकेट असल्याचे कंगनाने म्हटले आहे.

आपल्या परखडपणासाठी ओळखली जाणारी, बॉलिवूडमधील घराणेशाहीबद्दल आवाज उठवणारी बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत सध्या काहीशी चिंतेत आहे. कारण काय तर, फॉलोअर्सची संख्या. होय, अचानक गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरचे फॉलोअर्स कमी होऊ लागल्याने कंगना काहीशी अस्वस्थ झालीये.सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर कंगना राणौत बॉलिवूडच्या घराणेशाहीविरोधात मैदानात उतरली. करण जोहर, आलिया भट अशा अनेकांच्या तिने नाकीनऊ आणले. सुशांतला न्याय देण्याची मागणी करत तिने बॉलिवूडमधील घराणेशाहीविरोधात कंबर कसली.  याचा फायदा काय तर,  यानंतर कंगनाच्या लोकप्रियतेचा ग्राफ अचानक वाढला होता. सोशल मीडियावरच्या तिच्या फॉलोअर्सची संख्येत जबरदस्त वाढ झाली होती. मात्र गेल्या काहीदिवसांत अचानक  तिचे फॉलोअर्स कमी होऊ लागले आहेत. थोडे थोडके नव्हे तर एका दिवसात सरासरी 40 ते 50 हजार लोक तिला अनफॉलो करु लागले आहेत. कंगनाने स्वत: याकडे लक्ष वेधले. हे असे का होतेय, ट्विटर असे का करतेय? असा प्रश्न तिने युजर्सला उद्देशून केला आहे.

म्हणे, हा एक पॅटर्न...

 माझे ट्विटर फॉलोअर्स गेल्या दिवसांत अचानक कमी होत आहेत. यामध्ये एक पॅटर्न असल्याचा संशय मला येतोय. दिवसाला 40 ते 50 हजार फॉलोअर्स कमी होत आहेत. मी ट्विटरवर नवीन आहे. यामागचे कारण मला माहित नाही. हे असे का होतेय कोणी सांगेल का? ते असे का करत आहेत, काही कल्पना आहे का? अशा आशयाचे ट्विट कंगनाने केले आहे. या ट्विटमध्ये तिने ट्विटर इंडियाला देखील टॅग केले आहे.  

हे रॅकेट...

आपल्या दुस-या ट्विटमध्ये हे खूप मोठे रॅकेट असल्याचे कंगनाने म्हटले आहे. ‘देशभक्तांना प्रत्येक ठिकाणी संघर्ष करावा लागतो, हे मी अनुभवते आहे. हे रॅकेट खूप शक्तिशाली आहे,’ असे तिने म्हटलेय.

 

टॅग्स :कंगना राणौत