Join us

कमल हासनने मुलीला ट्विट करून विचारले; ‘तू धर्मांतर केले आहेस काय?’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2017 20:51 IST

कमल हासनची मुलगी अक्षरा हासन सध्या तिच्या आगामी ‘विवेगम’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र अशातही ती चित्रपटामुळे नव्हे ...

कमल हासनची मुलगी अक्षरा हासन सध्या तिच्या आगामी ‘विवेगम’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र अशातही ती चित्रपटामुळे नव्हे तर धर्मांतर केल्याने चर्चेत आहे. अर्थात ही चर्चा वादग्रस्त असल्याने तिच्यावर काही प्रमाणात टीकाही केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच अक्षराने धर्मांतर केल्याची बातमी समोर आली होती. परंतु याविषयी अक्षराचे पप्पा कमल हासन अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. कारण कमल हासन यांनी आपल्या मुलीला चक्क सोशल मीडियावरच धर्मांतर केल्याविषयीचे काही प्रश्न विचारले. वास्तविक अशा प्रकारची चर्चा चार भिंतीच्या आत होणे अपेक्षित होते. परंतु कमल यांनी असे न करता थेट ट्विटरवरच अक्षराला याबाबतची विचारणा केली. विशेष म्हणजे अक्षरानेदेखील कुठल्याही बंधनांचा विचार न करता पप्पांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांचे ट्विटच्या माध्यमातूनच उत्तरे दिली. कमल हासन यांनी एक ट्विट करून विचारले की, ‘अक्षू, तू धर्मांतर केले आहेस काय? जर तू असे केले असेल तर माझ्याकडून तुला भरपूर प्रेम, कारण धर्माच्या विपरीत विचार केल्यास प्रेमाला कुठल्याही प्रकारची अट नसते. आयुष्याच्या आनंद घे, तुझा बापू!’अक्षराने पप्पा कमल हासन यांच्या ट्विटला रिट्वििट करताना उत्तर दिले की, ‘हाय बापूजी... नही... मी अजूनही नास्तिक आहे. परंतु मी बौद्ध धर्मानुसार जीवन जगण्याचा आणि बुद्धाच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करते.’ अक्षराचे हे उत्तर बरेच काही सांगून जाणारे आहे. त्याचबरोबर कमल यांनी आपल्या मुलींना कशा पद्धतीने स्वातंत्र्य दिले आहे हेदेखील यातून अधोरेखित होते. सध्या अक्षरा चित्रपटांपेक्षा व्यक्तिगत आयुष्यामुळेच अधिक चर्चेत आहे. अर्थात यासाठी तिला पप्पा कमल हासन यांचे प्रचंड पाठबळ असल्याने ती आनंदी आहे.