Join us  

काजोलने शेअर केला 'तान्हाजी'मधील तिचा बेस्ट फोटो, मानले फोटोग्राफरचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 3:24 PM

काजोलने तान्हाजी सिनेमातील तिचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

अजय देवगणकाजोल यांचा काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला चित्रपट तान्हाजी - द अनसंग वॉरियर सुपरडुपर हिट ठरला. या चित्रपटाने भारतात दोनशे कोटींचा पल्ला पार केला तर जगभरात तीनशे कोटींहून जास्त कमाई केली. तान्हाजी : द अनसंग वॉरियर चित्रपटात अजयने मराठा वीर योद्धा तानाजी मालुसरेंची भूमिका साकारली आहे. तर काजोलने सावित्रीबाई मालुसरे यांची महत्त्वाची भूमिका साकारली आहे. काजोलने नुकताच तान्हाजी सिनेमातील तिचा बेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

अभिनेत्री काजोलने इंस्टाग्रामवर तान्हाजी चित्रपटातील तिचा फोटो शेअर करत लिहिले की, मिकी कॉन्ट्रॅक्टर तू नेहमीच सर्वोत्कृष्ट फोटो क्लिक करतोस. यासाठी मी तुझी आभारी आहे.

तिच्या या फोटोवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. या कमेंटमध्ये मिकी कॉन्ट्रॅक्टरने तिला यावर म्हटलं की तू प्रेरणा देते मला. तर काजोलची बहिण म्हणजेच अभिनेत्री तनिषाने कमेंट केलीय की, तू आई (अभिनेत्री तनुजा) सारखी दिसते आहेस. स्टनिंग शॉट.

काजोलने लोकमतला दिलेल्या मुलाखतीत तान्हाजीबद्दल सांगितलं होतं की, या चित्रपटाची पटकथा ऐकल्यावर मी या भूमिकेचे प्रेमात पडले. मी कधीच ऐतिहासिक चित्रपटामध्ये काम केलेले नाहीये. या चित्रपटात काम करण्याचा अनुभव खूपच वेगळा होता. या चित्रपटासाठी ओम राऊतने प्रचंड अभ्यास केला आहे. त्याने प्रत्येक गोष्टीचा बारकाव्याने अभ्यास केला असल्याने ही भूमिका साकारणे सोपे गेले. या चित्रपटातील वेशभुषा, रंगभूषा खूपच छान आहे. नऊवारी साडी घालण्याचा तर अनुभव खूपच वेगळा आणि छान होता.

मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ‘तान्हाजी’ रिलीज झाला आणि बघता बघता या सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले.

इतके की, दरदिवशी या सिनेमाने सरासरी 50 ते 60 लाखांची कमाई केली. या वर्षीचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर म्हणून ‘तान्हाजी’ने नवा विक्रम नोंदवला.

टॅग्स :काजोलअजय देवगणतानाजी