Join us  

कादर खान ‘सुपुर्द-ए-ख़ाक’; कॅनडात पार पडला दफनविधी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 2:04 PM

ज्येष्ठ अभिनेता आणि पटकथा लेखक कादर खान यांच्यावर कॅनडात दफनविधी पार पडले. टोरँटो येथे झालेल्या दफनविधीला त्यांचे कुटुंबिय आणि नातेवाईक हजर होते.

ज्येष्ठ अभिनेता आणि पटकथा लेखक कादर खान यांच्यावर कॅनडात दफनविधी पार पडले. टोरँटो येथे झालेल्या दफनविधीला त्यांचे कुटुंबिय आणि नातेवाईक हजर होते. दफनविधीपूर्वी कादर खान यांचे पार्थिव टोरँटो येथील मशीदमध्ये ठेवण्यात आले. या ठिकाणी नमाज आणि इतर अखेरचे विधी पार पडले. मिसीस्साउगा येथील दफनभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. यावेळी मोठ्या संख्येने चाहते उपस्थित होते. 

गत ३१ डिसेंबरला कादर खान यांचे दीर्घ आजाराने निधन झाले होते. ते ८१ वर्षांचे होते. कादर खान हे प्रोग्रेसिव्ह सुप्रान्यूक्लीयर पाल्सी या आजाराने ग्रस्त होते. यामुळे त्यांच्या मेंदूने काम करणे बंद केले होते. २२ आॅक्टोबर १९३७ रोजी जन्मलेल्या कादर यांनी १९७३ मध्ये ‘दाग’ या चित्रपटातून अभिनय कारकिर्द सुरु केली होती. यात राजेश खन्ना मुख्य भूमिकेत होते. यापूर्वी रणधीर कपूर व जया बच्चन यांच्या ‘जवानी दिवानी’ या चित्रपटासाठी कादर खान यांनी संवाद लेखन केले होते.

मनमोहन देसाई आणि प्रकाश मेहरा यांच्यासोबत त्यांनी अनेक पटकथा लिहिल्या. मनमोहन देसाई यांच्यासोबत मिळून कादर खान यांनी धर्मवीर, गंगा जमुनी सरस्वती, कुली, देशप्रेमी, सुहाग, अमर अकबर अँथोनी आदी चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. तर मेहरा यांच्यासोबत मिळून ज्वालामुखी, शराबी, लावारिस, मुकद्दर का सिकंदर अशा अनेक चित्रपटांच्या पटकथांचे लेखन केले. त्यामुळे पटकथा लेखक अशीही कादर खान यांची ओळख होती.  कादर खान यांनी सुमारे ३०० चित्रपटांत काम केले आणि २५० पेक्षा अधिक चित्रपटांसाठी संवादलेखन केले.    

टॅग्स :कादर खान