Join us  

Death Anniversary : केवळ 5 रूपयांसाठी चित्रपटातील गर्दीचा भाग बनायचा हा अभिनेता, पुढे बनला स्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 11:12 AM

या अभिनेत्याने लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्यांचा खट्याळ चेहरा पडद्यावर दिसताच प्रेक्षकांच्या चेह-यावर हास्य फुलायचे.

ठळक मुद्दे दारूड्याची भूमिका जॉनी वॉकर यांनी अशी काही जिवंत केली की, गुरुदत्त कमालीचे प्रभावित झाले. त्यांनी लगेच ‘बाजी’ चित्रपटामध्ये त्यांना भूमिका दिली. या चित्रपटानंतर जॉनी वॉकर यांनी पुन्हा कधीच मागे वळून पाहिले नाही.

अभिनेते जॉनी वॉकर यांनी लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्यांचा खट्याळ चेहरा पडद्यावर दिसताच प्रेक्षकांच्या चेह-यावर हास्य फुलायचे. जॉनी वॉकर यांना पाहून ते एक नंबरचे दारूडे असतील, असेच सगळ्यांना वाटायचे. पण ख-या आयुष्यात जॉनी वॉकर यांनी दारूला कधी हातही लावला नाही.   29 जुलै 2003 रोजी जॉनी वॉकर यांनी जगाला अलविदा म्हटले. आज त्यांचा स्मृतीदिन...

जॉनी वॉकर यांचे खरे नाव  बदरुद्दीन जमालुद्दीन काजी असे होते. मात्र बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर त्यांनी  जॉनी वॉकर असे नवे नाव धारण केले. त्यांचे हे नाव व्हिस्कीच्या ब्रँडच्या नावावरुन देण्यात आल्याचे म्हटले जाते.  दारूड्या व्यक्तीचा दमदार अभिनय   केल्यामुळेच जॉनी वॉकर या व्हिस्कीच्या ब्रँडच्या नावावरून त्यांना हे नाव दिल्याचे म्हटले जाते.

जॉनी वॉकर यांचे वडील इंदूरमध्ये एका मिलमध्ये नोकरी करायचे. पण ही मिल बंद झाली आणि 1942 मध्ये त्यांचे अख्खे कुटुंब मुंबईला आले.  त्यांच्या कुटुंबात एकूण १५ जण होते.  कुटुंबाचा गाडा ओढणे वडिलांना कठीण झाले आणि त्यांच्या मदतीसाठी जॉनी वॉकर यांनी बस कंडक्टरची नोकरी धरली.  त्यावेळी ते २७ वर्षांचे होते.

 बस कंडक्टरची नोकरी मिळाल्याने जॉनी वॉकर खूश होते. याचे कारण म्हणजे, यानिमित्ताने त्यांना मुंबईभर फिरता येईल. अर्थात ही  नोकरी करतानासुद्धा त्यांच्यातील विनोदबुद्धी त्यांना शांत बसू द्यायची नाही. बसमधील प्रवाशांना अनेक किस्से सांगून ते त्यांना हसवत. याचदरम्यान तेव्हाचे दिग्ग्ज खलनायक एन. ए. अन्सारी आणि के. आसिफ यांचा मॅनेजर रफीक यांच्यासोबत त्यांची ओळख झाली. रफीक यांच्या मदतीने चित्रपटात गर्दीच्या सीनमध्ये जॉनी वॉकर यांना स्थान मिळू लागले. गर्दीचा भाग बनून दिग्दर्शक म्हणेल ते करायचे, या कामासाठी त्यांना त्यावेळी 5 रूपये मिळत.

एकेदिवशी ‘आखिरी पैमाने’ या चित्रपटात त्यांना छोटीशी भूमिका मिळाली. या भूमिकेसाठी त्यांना मानधनरूपात 80 रूपये मिळाले. हे 80 रूपये पाहून जॉनी वॉकर अवाक् झालेत. कारण बस कंडक्टर म्हणून महिनाभर नोकरी केल्यावर त्यांना पगारापोटी केवळ 26 रूपये मिळायचे.

एकदा गुरुदत्त यांच्या ‘बाजी’ या चित्रपटासाठी पटकथा लिहिणारे बलराज साहनी यांची नजर जॉनी वॉकर यांच्यावर पडली. साहनी यांनी त्यांची गुरुदत्त यांच्याशी भेट करून दिली. यावेळी त्यांना दारूड्याचा अभिनय करण्यास सांगितले गेले. दारूड्याची भूमिका जॉनी वॉकर यांनी अशी काही जिवंत केली की, गुरुदत्त कमालीचे प्रभावित झाले. त्यांनी लगेच ‘बाजी’ चित्रपटामध्ये त्यांना भूमिका दिली. या चित्रपटानंतर जॉनी वॉकर यांनी पुन्हा कधीच मागे वळून पाहिले नाही. रुपेरी पडद्यावरील सर्वोत्तम हास्य कलाकाराचा किताब त्यांनी पटकावला. गुरूदत्त यांनीच त्यांना जॉनी वॉकर हे नाव दिले.  

टॅग्स :जॉनी वॉकर