Join us  

JNU Attack : दीपिका पादुकोणच्या जेएनयू भेटीने छेडले ट्विटरवॉर; एकीकडे Support, एकीकडे Boycott

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 10:37 AM

JNU Protest : अभिनेत्री दीपिका पादुकोणने अचानक जेएनयूत पोहोचत विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभाग घेतला आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या.

जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीत (जेएनयू) झालेल्या मारहाण आणि हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. अशात अभिनेत्री दीपिका पादुकोणने अचानक जेएनयूत पोहोचत विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभाग घेतला आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या.  यावेळी कन्हैया कुमारही दीपिकासोबत दिसल्याने हा चर्चेचा विषय ठरला.   दीपिकाने आंदोलनात सहभाग नोंदवल्यानंतर अनेकांनी तिच्या या कृतीचे जोरदार समर्थन केले. पण काहींनी मात्र यावरून दीपिकाला लक्ष्य करत तिच्या आगामी सिनेमावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. यामुळे सोशल मीडियावर दीपिकाच्या बाजूने आणि दीपिकाच्या विरोधात असे दोन मतप्रवाह पाहायला मिळाले. ट्विटरवर #BoycottChhpaak आणि #ISupportDeepika असे दोन परस्परविरोधी हॅशटॅग ट्रेंड करू लागले.

दीपिकाच खरी वाघीण

दीपिकाच खरी वाघीण, आम्ही दीपिकाचा ‘छपाक’ हा सिनेमा पाहणार अशा प्रतिक्रिया व्यक्त करत अनेकांनी दीपिकाचे समर्थन केले. समर्थकांची संख्या मोठी असल्याने काहीच तासांत आयसपोर्टदीपिका, आयस्टँडविददीपिका हे ट्विटरवर टॉप ट्रेंडमध्ये आले आणि त्यांनी बॉयकॉटछपाकला मागे टाकले. 

बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनीही दीपिकाला खंबीर पाठींबा दिला. दिग्दर्शक अनुराग कश्यप, विशाल भारद्वाज, अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी दीपिकाला पाठींबा दिला. ‘दीपिका आम्हाला तुझा अभिमान आहे,’ अशा आशयाचे ट्विट या सर्वांनी केले.

एकीकडे कौतुक, एकीकडे टीका

 भाजपचे दिल्लीतील प्रवक्ते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी ट्विट करून ‘छपाक’ वर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. ‘दीपिकाने तुकडे तुकडे गँग आणि अफझल गँगला पाठिंबा दिला आहे. तिच्या सिनेमावर बहिष्कार घाला,’असे ट्विट त्यांनी केले आणि त्यानंतर ट्विटरवर ‘छपाक’चा विरोध सुरू होऊन #BoycottChhpaak हा ट्रेंड सुरू झाला.

  दीपिकाने तिच्या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी वापरलेला हा फंडा योग्य नाही. त्यामुळे आम्ही ‘तान्हाजी’ सिनेमा पाहणार आहोत, अशा प्रतिक्रिया विरोध करणा-यांनी दिल्या.

टॅग्स :दीपिका पादुकोणजेएनयूछपाक