Join us  

श्रीदेवी यांच्या जाण्याच्या धक्क्यातून अजूनही सावरली नाही जान्हवी, इफ्फीमध्ये शेअर केल्या २०१८ सालातील कडू गोड आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 2:06 PM

अभिनेत्री आणि बॉलीवुडच्या चांदनी श्रीदेवी यांना गमावलं. एका दुर्घटनेत श्रीदेवी यांचा अपघाती मृत्यू झाला. मात्र आईच्या मृत्यूनंतर आठवडाभरातच जान्हवी कामावर परतली आणि धडक सिनेमाच्या शुटिंगला सुरूवात केली.

अभिनेत्री जान्हवी कपूरसाठी २०१८ हे वर्ष थोडी खुशी,ज्यादा गम असं होतं. वर्षाच्या सुरूवातीलाच जान्हवीने आपली आई दिवंगत अभिनेत्री आणि बॉलीवुडच्या चांदनी श्रीदेवी यांना गमावलं. एका दुर्घटनेत श्रीदेवी यांचा अपघाती मृत्यू झाला. मात्र आईच्या मृत्यूनंतर आठवडाभरातच जान्हवी कामावर परतली आणि धडक सिनेमाच्या शुटिंगला सुरूवात केली. धडक सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकला आणि तिकीटखिडकीवर चांगलं यशही मिळालं. विशेषतः सिनेमातील जान्हवीची भूमिका रसिकांना भावली. धडक सिनेमात काम करून स्वतःला सावरू शकलो असं जान्हवीने अनेक मुलाखतीत सांगितलं. याच पार्श्वभूमीवर गोव्यात सुरू असलेल्या इफ्फीमध्येही जान्हवीने २०१८ वर्षे तिच्यासाठी कसं होतं याबाबतच्या आठवणी जागवल्या. 

शिवाय आपल्या आईने म्हणजेच श्रीदेवीने अभिनय क्षेत्रात जी उंची गाठली ती गाठणं आपल्यासाठी अशक्य आहे किंवा तसं काही करण्याची इच्छा नसल्याचेही जान्हवीेने सांगितलं. “खरंच काही सांगणं बोलणं अवघड आहे. आपली भरभराट झाली आहे असं म्हणताना वैयक्तीकदृष्ट्या झाली आहे असं म्हणणं संयुक्तिक ठरेल. मात्र कलाकार म्हणून किती झाली हे सांगणं कठीण असल्याचे तिने म्हटलं. मात्र हे वर्ष कडू गोड आठवणींचं होतं असंही जान्हवीने सांगितलं. आईच्या अचानक जाण्याचा धक्का पचवणं अजूनही कठीण असल्याचं जान्हवीने सांगितले. 

मात्र त्यानंतर सारं कुटुंब एक झालं ही एक चांगली गोष्ट घडल्याचं तिला वाटतं. रसिक आणि चित्रपटसृष्टीकडून जे प्रेम मिळालं त्याबाबत स्वतःला नशीबवान समजते तसंच याबाबत तिने साऱ्यांचे आभार मानले आहेत. आपल्या आई-वडिलांना अभिमान वाटावा असं काम करू शकल्याचा आनंदही तिने व्यक्त केला आहे. यावेळी जान्हवीसह तिचे वडील बोनी कपूरही उपस्थित होते. आगामी काळात जान्हवी कपूर करण जोहरच्या तख्त सिनेमात झळकणार असून २०२० साली हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येईल.

 

टॅग्स :जान्हवी कपूरश्रीदेवी