Join us  

या वर्षाला निरोप तरी कसा देऊ...! इरफानच्या पत्नीची ही भावूक पोस्ट वाचून तुमचेही डोळे पाणावतील

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 5:33 PM

या पोस्टसोबत सुतापाने इरफानचे काही अनसीन फोटो व एक व्हिडीओ शेअर केला आहे.

ठळक मुद्दे इरफान खानच्या अभिनयाने सजलेला ‘द साँग ऑफ स्कॉर्पिअन्स’ हा अखेरचा चित्रपट नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

2020 या मावळत्या वर्षाचा आजचा अखेरचा दिवस. कोरोना सारख्या महामारीमुळे बदनाम झालेले हे वर्ष कधी एकदा संपते असे सगळ्यांना झाले आहे. हे वर्ष लवकर संपून, नव्या आशेचे, नव्या उमेदीचे नवे वर्ष उगवण्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. पण इरफान खानची पत्नी सुतापा हिला एक वेगळाच प्रश्न छळतो आहे. मावळत्या वर्षाला वाईट ठरवून कसा निरोप देऊ, असा प्रश्न तिने केला आहे. कारण काय, तर यासाठी तिची सुंदर, मार्मिक पोस्ट तुम्ही वाचायला हवी.

‘2020 या वर्षाला वाईट तरी कसे म्हणू? कारण या वर्षात तू होतास. गेल्या वर्षी याच दिवशी माझ्या जवळ होतास, बागकाम करत होता, पाखरांसाठी घरटे बांधत होतास. 2020 ला निरोप तरी कसा देऊ? इरफान, 2021 चे स्वागत कसे करू, मला कळत नाहीये,’ अशी अतिशय भावूक पोस्ट सुतापाने लिहिली आहे. इरफानच्या आठवणीत लिहिलेली तिची ही पोस्ट कुठल्याही संवेदनशील मनाला वेदना देणारी आहे.या पोस्टसोबत सुतापाने इरफानचे काही अनसीन फोटो व एक व्हिडीओ शेअर केला आहे. इरफान कॅन्सरने पीडित होता. यावर्षी 29 एप्रिलला इरफानचे जगाचा निरोप घेतला होता.

नव्या वर्षात प्रदर्शित होणार अखेरचा सिनेमा...

 इरफान खानच्या अभिनयाने सजलेला ‘द साँग ऑफ स्कॉर्पिअन्स’ हा अखेरचा चित्रपट नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.   खरं तर हा चित्रपट इरफानचा शेवटचा प्रोजेक्ट नव्हता. पण बरीच वर्षे हा चित्रपट प्रदर्शनच्या प्रतीक्षेत होता. हा चित्रपट त्याच्या करिअरमधील थिएटरमध्ये रिलीज होणारा शेवटचा चित्रपट ठरणार आहे. यापूर्वी ऑगस्ट 2017 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये पार पडलेल्या 70 व्या लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा प्रीमिअर झाला होता.  ‘द साँग ऑफ स्कॉर्पिअन्स’ या चित्रपटात इरफान खानने एका व्यापाराची भूमिका साकारली आहे. इराणी अभिनेत्री गोलशिफ्तेह फरहानी आणि ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री वहीदा रहमान यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

टॅग्स :इरफान खान