Join us  

​ इंडियाचा ‘ड्रामा किंग’ कोण? नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आत्मचरित्रात मिळणार उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 10:29 AM

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या आयुष्यातील अनेक सत्ये आपल्याला पुस्तक रूपात वाचता येणार आहेत. ...

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या आयुष्यातील अनेक सत्ये आपल्याला पुस्तक रूपात वाचता येणार आहेत. होय, नवाजचे आत्मचरित्र लवकरच आपल्याला वाचायला मिळणार आहे.  ‘द इन्क्रेडीबल लाइफ आॅफ ड्रामा किंग आॅफ इंडिया’ असे त्याच्या या आत्मचरित्राचे नाव आहे. पत्रकार रितुपर्णा चॅटर्जी आणि नवाजुद्दीन यांच्यातील संवाद प्रश्नोत्तर रूपात यात वाचायला मिळेल. जीवनातील अडथळे, कठीण प्रसंग, आनंदाचे क्षण असे सगळे यात असणार आहे. अगदी गावातील दिवसांपासून तर अभिनेता बनण्यापर्यंतचा अख्खा प्रवास, या काळात वाट्याला आलेला संघर्ष यात असेल. दोनेक वर्षांपूर्वी नवाजने या आत्मचरित्रावर काम सुरू केले आणि आता ते प्रकाशनाच्या वाटेवर आहे.‘जवळपास दोन वर्षांपूर्वी मी आत्मचरित्रावर काम करण्यास सुरुवात केली होती. मी गावी राहात होतो तेव्हापासून ते अभिनेता होईपर्यंतचा माझा प्रवास या आत्मचरित्रात मांडण्यात आलाय. येत्या दोन महिन्यांत आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात येईल,’असे नवाजने सांगितले.नवाजुद्दीन आज बॉलिवूडचा प्रतिभावान कलाकार म्हणून ओळखला जातो. पण इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. कुठलाही गॉडफादर नसताना, सुंदर चेहरा नसताना नवाजने बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयामधून अभिनयाचे शिक्षण घेतलेल्या नवाजने १९९९ सालच्या ‘सरफरोश’ चित्रपटात एक छोटी भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘शूल’, ‘आजा नचले’, ‘न्यूयॉर्क’ इत्यादी चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिका केल्या.   २०१२ साली विद्या बालनच्या ‘कहानी’ या भूमिकेने नवाजला खरी ओळख दिली. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.