Join us  

Independence Day 2019 : स्वातंत्र्य दिनादिवशी पाहू शकतात हे देशभक्तीपर हिंदी चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 10:00 AM

हिंदी चित्रपटसृष्टीनं देखील एकापेक्षा एक दमदार देशभक्तीवर आधारीत चित्रपट बनविले आहेत.

भारतात आज सगळीकडे ७३वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात असून सगळीकडे उत्साहाचं वातावरण पहायला मिळत आहे. बॉलिवूडदेखील स्वातंत्र्यदिन साजरा करतो. हिंदी चित्रपटसृष्टीनं देखील एकापेक्षा एक दमदार देशभक्तीवर आधारीत चित्रपट बनविले आहेत. हे चित्रपट पाहून तुम्ही स्वातंत्र्यदिन साजरा करू शकता. 

मिशन मंगल

या वर्षी आणि तेही १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनादिवशी मिशन मंगल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट मल्टीस्टारर असून या चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, नित्या मेनन, किर्ती कुल्हारी व शर्मन जोशी हे कलाकार आहेत.  इस्रोचे अविश्वसनीय यश पाहून नक्कीच तुम्हाला देशाचा अभिमान वाटेल.

बाटला हाऊस

जॉन अब्राहमची मुख्य भूमिका असलेला चित्रपटदेखील यंदाच्या स्वातंत्र्य दिनी रसिकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट दिल्लीमध्ये १३ सप्टेंबर, २००८ साली झालेल्या सीरियल बॉम्बस्फोटानंतर झालेल्या बाटला हाऊस एन्काउंटरवर आधारीत आहे. या चित्रपटात पोलीस विभागाची देशभक्ती व त्याग आपल्याला पहायला मिळेल.

उरी: द सर्जिकल स्ट्राइक 

यावर्षी सुपरहिट ठरलेला चित्रपट  'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' उरीमध्ये भारतीय सुरक्षादलांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्टाईक केलं होतं, त्यावर आधारीत आहे. या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत असून त्याच्या दमदार परफॉर्मन्ससाठी त्याला यावर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

रंग दे बसंती 

आमीर खान, सिद्धार्थ, शर्मन जोशी, कुणाल कपूर, अतुल कुलकर्णी,आर. माधवन व सोहा अली खान यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट रंग दे बसंती रसिकांना खूप भावला होता. या चित्रपटात आजच्या काळातील युवांची कथा रेखाटण्यात आली आहे जे देश प्रेमासाठी आपल्या प्राणाची आहुती देतात. 

द लीजेंड ऑफ भगत सिंग

राजकुमार संतोषी दिग्दर्शित द लीजेंड ऑफ भगत सिंग चित्रपट शहीद भगत सिंग यांच्यावर बनलेला सर्वात चांगला चित्रपट मानला जातो. या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाला २००३ साली सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार व फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या चित्रपटातून भगत सिंग यांचे देशावरील प्रेम, त्याग व शौर्य पाहून प्रेरणा मिळते.

टॅग्स :स्वातंत्र्य दिनउरीबाटला हाऊस