Join us

​इम्तियाज अलीचा पुढील चित्रपट जपानी संस्कृतीवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 21:13 IST

चित्रपटाच्या माध्यमातून प्रवास व संस्कृतीचे दर्शन घडविणार दिग्दर्शक म्हणून इम्तियाज अली प्रसिद्ध आहे. लवकरच इम्तियाज अली दिग्दर्शित शाहरुख खान ...

चित्रपटाच्या माध्यमातून प्रवास व संस्कृतीचे दर्शन घडविणार दिग्दर्शक म्हणून इम्तियाज अली प्रसिद्ध आहे. लवकरच इम्तियाज अली दिग्दर्शित शाहरुख खान व अनुष्का शर्मा यांची प्रमुख भूमिका असलेला रहनुमा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर इम्तियाज अली एका आंतरराष्ट्रीय चित्रपटाची निर्मिती करणार असून यातून जपानी संस्कृतीचे दर्शन घडविणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या चर्चेत असलेल्या बातम्यानुसार बॉलिवूड दिग्दर्शक इम्तियाज अली जपान सरकार सोबत झालेल्या सांस्कृतिक कराराअंतर्गत एका चित्रपटाची निर्मिती करणार आहे. हा चित्रपट जपानच्या सहकार्याने तयार केला जाणार आहे. या चित्रपटाचे नाव १९६६ साली प्रदर्शित झालेल्या ‘लव इन टोकिया’ या चित्रपटाच्या नावावरच असेल. या चित्रपटाची संपूर्ण शूटिंग जपानमध्येच होणार असून या चित्रपटाचा इम्तियाज अली सहनिर्माता असणार आहे. जपान-भारत सहकार्य या अंतर्गत तयार होणारा हा पहिला चित्रपट असेल.  इम्तियाज अली सध्या शाहरुख खान व अनुष्का शर्मा यांच्यासोबतच्या चित्रपटात व्यस्त आहे. इम्तियाज म्हणाला, तमाशा या चित्रपटासाठी आम्ही काही सिन्स जपानमध्ये शूट केले होते. जपानने मला चांगलेच आकर्षित केले आहे, मी जपानच्या संस्कृतीला आपल्या रोमाँटिक चित्रपटाच्या माध्यमातून दाखविण्यास तयार आहे. आम्ही जेव्हा तमाशा या चित्रपटाचे शूट करीत होतो, त्यावेळी रणबीर कपूर व दीपिका पादुकोण जपानमध्ये येण्यास फार उत्सुक होते. मला नंतर कळाले की जपानमध्ये चांगले मीडिया हाऊस देखील आहेत. आमचा हा नवा चित्रपट १९६६ साली प्रदर्शित झालेल्या ‘लव इन टोकिया’चा रिमेक नसेल, या चित्रपटाची कथा वेगळी आहे. भारताचे विविध देशासोबत असलेल्या करारानुसार चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. चीन सोबत झालेल्या कराराअंतर्गत जॅकी चॅन, सोनू सूद व दिशा पटानी यांच्या भूमिका असणारा कुंफू योगा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित केला जाणार आहे.