Join us  

या प्रकारचा सिनेमा कोणालाही आवडणार नाही, हेच मला सांगितलं जात होतं -आयुषमान खुराणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 6:00 AM

"टॅबू समजल्या जाणाऱ्या विषयांवर सातत्याने सिनेमांच्या माध्यमातून लक्ष वेधायला हवे. कारण त्यामुळे खरंच लोकांची मानसिकता बदलण्यात साह्य होते. टॅबू समजल्या जाणाऱ्या विषयांना सामान्य करण्यासाठी आणि समाजात त्यासंदर्भात ठोस बदल करण्यासाठी बराच वेळ जातो, फार प्रयत्न करावे लागतात.

बॉलिवुड स्टार आयुष्यमान खुरानाने एकामागोमाग एक आठ हिट सिनेमे दिले आहेत. त्याने भारतीय सिनेमांना 'आयुष्यमान खुराना जॉनर' असा एक नवा प्रकार देऊ केला. आपल्या अनोख्या, क्वर्की, ठरलेल्या पठडी पलिकडली सिनेमांमुळे सिनेमाच्या इतिहासात त्याचे नाव धोके पत्करणारा हिरो म्हणून नोंदवलं गेलंय.

'टॅबू' समजल्या जाणाऱ्या विषयांना वाचा फोडण्यासाठी तो कायम प्रयत्न करत असतो. शुभ मंगल ज्यादा सावधान या प्रचंड लोकप्रिय झालेल्या सिनेमाला एक वर्ष पूर्ण झाले. भारतात समलैंगिक संबंधांसंदर्भात जे गैरसमज आहेत त्यावर या सिनेमात विनोदी पद्धतीने भाष्य करण्यात आले आहे. अशा प्रकारे डोळ्यात अंजन घालणारे सिनेमे सातत्याने का तयार व्हायला हवेत, हे आयुष्यमान सांगतोय. 

"टॅबू समजल्या जाणाऱ्या विषयांवर सातत्याने सिनेमांच्या माध्यमातून लक्ष वेधायला हवे. कारण त्यामुळे खरंच लोकांची मानसिकता बदलण्यात साह्य होते. टॅबू समजल्या जाणाऱ्या विषयांना सामान्य करण्यासाठी आणि समाजात त्यासंदर्भात ठोस बदल करण्यासाठी बराच वेळ जातो, फार प्रयत्न करावे लागतात.

 

'शुभ मंगल ज्यादा सावधान' सिनेमामधून आम्ही भारतात समलैंगिक संबंधांना मुख्य प्रवाहात आणण्यासंदर्भात चर्चा सुरू केली, त्यातून काही हातभार लावण्याचा प्रयत्न केला याचा मला आनंद आहे. लोकांच्या दृष्टिकोनात यामुळे काही फरक पडला तर आम्ही आमचं काम केलं असं म्हणता येईल," असं आयुष्यमान म्हणाला. समलैंगिक संबंधांवर हिट सिनेमा देणारा पहिला मेनस्ट्रीम हिरो आणि पडद्यावर पहिल्यांदा गे पुरुष साकारणारा अभिनेता अशी त्याची नवी ओळख आहे.

 

तो पुढे म्हणाला, "हा सिनेमा हिट झाल्याने एक लक्षात आलं की लोकांना अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चेत सहभागी व्हायचे आहे. भारतीय कुटुंबांनी एकत्र हा सिनेमा पाहिला हीच माझ्यासाठी फार मोठी यशोगाथा आहे. कारण, समलैंगिक संबंधांच्या संदर्भात सर्वसमावेशकतेचे बीज आपली कुटुंबेच रोवू शकतात." 

 

हा सिनेमा यशोगाथा ठरला याचा आयुष्यमानला प्रचंड आनंद आहे. कारण, सिनेसृष्टीत त्याला अनेकांनी शुभ मंगल ज्यादा सावधान हा सिनेमा करू नकोस असा सल्ला दिला होता. तो म्हणाला, "या सिनेमाला मिळालेला प्रतिसाद पाहून मी भारावून गेलो कारण सगळ्यांनीच मला सांगितलं होतं की याप्रकारचा सिनेमा मी करू नये आणि कोणीही हा सिनेमा मान्य करणार नाही. पण, या सिनेमाला मिळालेल्या कौतुकाने मी भारावून गेलो. हा सिनेमा एक व्यावसायिक सिनेमा म्हणून स्वीकारला गेला हे त्याचं यश आहे आणि अशा विषयांवर भविष्यात येऊ शकणाऱ्या सिनेमांसाठी त्याने एक नवा मार्ग तयार करण्याचे काम केले अशी मला आशा आहे."

हा अभिनेता पुढे म्हणाला, "या प्रकारच्या चर्चांना मोकळेपणे पुढे आणणे हा कायमच माझा प्रयत्न राहिला आहे आणि पुरोगामी विचार करणाऱ्या समाजासाठी मी हातभार लावत असतो. माझ्या सिनेमांमधून मी ज्या विषयांना हात घालतो त्यावर लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा करण्याचा माझा प्रयत्न असतो. यापुढेही, मी हे करतच राहीन. कारण, एक कलाकार म्हणून यातून मला समाधान मिळते आणि असे आणखी विषय शोधण्याची प्रेरणाही मिळते." 

टॅग्स :आयुषमान खुराणा