Join us  

 ऋषी कपूर यांना आत्ता कुठे मिळू लागलेय खरे समाधान!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 9:18 PM

ऋषी कपूर निर्विवाद एक दिग्गज अभिनेते आहेत. पण ऋषी कपूर यांना मिळायला हवा होता तो सन्मान मिळाला नाही, असे अनेकजण मानतात. खुद्द ऋषी कपूर यांनाही ही खंत वाटते का?

ऋषी कपूर निर्विवाद एक दिग्गज अभिनेते आहेत. पण ऋषी कपूर यांना मिळायला हवा होता तो सन्मान मिळाला नाही, असे अनेकजण मानतात. खुद्द ऋषी कपूर यांनाही ही खंत वाटते का? असा प्रश्न त्यामुळेच पडणे स्वाभाविक आहे. फर्स्टपोस्टला दिलेल्या मुलाखतीत नेमका हाच प्रश्न ऋषी यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी अगदी मनमोकळे उत्तर दिले. ते म्हणाले की, माझे नाव चिंटू आहे आणि मी बॉलिवूडमध्ये आलो तेव्हा केवळ २१ वर्षांचा होता, हे यामागचे कारण असू शकेल. त्यावेळी मी केवळ गुलाबी गुबगुबीत गालांचा मुलगा होतो. कदाचित म्हणून त्याकाळात मला कुणीही गंभीर चित्रपट दिले नाहीत. करिअरच्या सुरूवातीची २५ वर्षे मी नुसता गाणी गात झाडांच्या अवती-भवती नाचत होतो. केवळ जर्सी घालून पैसे छापत होतो. कामात समाधान नव्हते. खरे काम तर मला आत्ता कुठे मिळू लागलेय. पण आधी काय झाले, याचे मला जराही दु:ख नाही. कुठलीही खंत नाही. त्याकाळात मी प्रचंड एन्जॉय केला. अर्थात त्या काळात मी नंबर वन स्टार नव्हतो. पण ज्यांचे चित्रपट विकले जात अशा पहिल्या पाचांमध्ये माझे नाव नक्कीच होते.रणबीरबदद्लही ते बोलले. रणबीर माझ्यापेक्षा बराच पुढे आहे. रणबीरने बर्फी साईन केला तेव्हा माझ्या भावांनी आणि मित्रांनी त्याला वेड्यात काढले होते. रणबीर हे काय करतोय, त्याला चांगले रोमॅन्टिक चित्रपट करायला हवेत. मूकबधिर बनून त्याला काय आर्ट फिल्मचा हिरो बनायचे आहे का? असे ते विचारत. मी सुद्धा त्याच्या चित्रपटांमुळे स्वत:ला असुरक्षित समजू लागलो होतो. मी त्याच्या कामात दखल देत नाही. पण मी चिंतीत होतो. त्याने असे चित्रपट करू नये, असे मलाही वाटत होते. पण त्याने सगळ्यांनाच चूक ठरवले. तो ‘संजू’ करत होता, तेव्हाही लोकांनी त्याला वेड्यात काढले होते. पण त्याने पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केले. ‘जग्गा जासूस’सारखे चित्रपट करून तो चुकलाही. पण मला त्याचा अभिमानचं वाटतो, असे ते म्हणाले.

टॅग्स :ऋषी कपूर