Join us  

मी आलियाचा भाऊ वगैरे नाही...! आलियासोबत हा अभिनेताही झाला ट्रोल, वैतागून लिहिली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 2:27 PM

ट्रोलर्सचे टोमणे ऐकून राहुल भट इतका वैतागला की, मी तिचा भाऊ वगैरे नाही, मला विनाकारण त्रास देऊ नका, असे सांगण्याची वेळ त्याच्यावर आली.

ठळक मुद्दे अर्थात याऊपरही ट्रोलर्सनी राहुल भटचा पिच्छा सोडला नाही. एका युजरने या  ट्विटनंतरही त्याला ट्रोल केले.

सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर  नेपोटिजमच्या मुद्यावरून बॉलिवूडच्या अनेक बड्या कलाकारांना लक्ष्य केले जातेय. काही स्टार किड्सही ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत. आलिया भट त्यापैकीच एक़ सुशांतच्या आत्महत्येनंतर आलियाला जबरदस्त ट्रोल केले जातेय. अशात काही जणांनी बॉलिवूड अभिनेता राहुल भट यालाही आलियाचा भाऊ समजून ट्रोल करायला सुरुवात केली. ट्रोलर्सचे टोमणे ऐकून राहुल भट इतका वैतागला की, मी तिचा भाऊ वगैरे नाही, मला विनाकारण त्रास देऊ नका, असे सांगण्याची वेळ त्याच्यावर आली.

तुम्हाला ठाऊक आहेच की,  राहुल भट हा महेश भट आणि किरण भट यांचा मुलगा आहे. किरण ही महेश भट यांची पहिली पत्नी आहे. महेश भट वयाच्या 20 व्या वर्षी कॉलेजमध्ये असताना लोरिए ब्राईट हिच्या प्रेमात पडले. आज तिला किरण भट म्हणून ओळखले जाते. पण लोकांनी या राहुलला नाही तर आलियाचा भाऊ समजून राहुल भट नावाच्या दुस-याच अभिनेत्याला ट्रोल करणे सुरु केले. मग मात्र त्याचा पारा चढला.

नेपोटिजमवरून आलियाला ट्रोल करणा-यांना उत्तर देत राहुलने  ट्विट केले. ‘तुम्ही आलिया भटला नेपोटिजमचा प्रॉडक्ट म्हणत असाल तर तुम्ही संपूर्ण मोहिमेलाच नुकसान पोहोचवत आहोत. आलिया एक शानदार व अभिनयाची दैवी देण लाभलेली अभिनेत्री आहे. तिच्या एकटीच्या दमावर सिनेमे चालतात, म्हणून आज ती इथे आहे आणि हो, मी सांगू इच्छितो की, मी तिला भाऊ वगैरे नाही. तेव्हा विनाकारण मला त्रास देऊ नका. तुम्ही कुणाशी बोलता, हे जाणून न घेता मला टॅग करू नका,’ असे राहुल भटने आपल्या  ट्विटमध्ये लिहिले.

अर्थात याऊपरही ट्रोलर्सनी राहुल भटचा पिच्छा सोडला नाही. एका युजरने या  ट्विटनंतरही त्याला ट्रोल केले. ‘हो, आम्ही समजू शकतो, तुला आलियाच्या डॅडच्या सिनेमात रोल हवा. ती अजिबात महान अभिनेत्री वगैरे नाही,’ असे या युजरने लिहिले. यामुळे राहुल भट आणखीच संतापला. ‘नाही, तिच्या वडिलांनी अलीकडे बनवलेले सिनेमे मला अजिबात आवडले नाहीत. आता बोला...,’ असे त्याने लिहिले.

टॅग्स :आलिया भट