यशशिखरावर 'तेज रफ्तार' !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2016 12:31 IST
घरच्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करुन सर्वोच्च शिखर गाठलेल्यांच्या यशोगाथा सिनेमा रुपात रसिकांनी पाहिल्या आहेत. आता याच पठडीतला आणखी एक ...
यशशिखरावर 'तेज रफ्तार' !
घरच्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करुन सर्वोच्च शिखर गाठलेल्यांच्या यशोगाथा सिनेमा रुपात रसिकांनी पाहिल्या आहेत. आता याच पठडीतला आणखी एक सिनेमा रसिकांच्या भेटीला लवकरच येत आहे. 'तेज रफ्तार' असे या सिनेमाचे नाव आहे. कौशिक गून आणि किंगशूक गून यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. झोपडपट्टीत जन्मलेल्या आणि शहरातल्या गर्दीत बालपण घालवलेल्या एका मुलाच्या अवतीभोवती या सिनेमाची कथा फिरते. जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गरजाही पूर्ण करु शकत नसलेल्या वातावरणात हा मुलगा लहानाचा मोठा होता. त्याचवेळी दैवाचा करिष्मा होतो आणि या मुलाचं जीवनच पालटतं. एक प्रसिद्ध क्रीडा प्रशिक्षक या मुलाच्या जीवनात येतो. तो या मुलाला प्रशिक्षण देतो आणि याच प्रशिक्षणाच्या जोरावर तो एक ऍथलिट बनतो. स्ट्रगल, ध्येय गाठण्याची जिद्द आणि स्वतःचं नाव कमावण्याची प्रबळ इच्छाशक्ती असं सारं चित्रण तेज रफ्तार या सिनेमात पाहायला मिळणार आहे. नुकतंच या सिनेमाचा सीन चित्रीत करण्यात आला. या सीनची कल्पना डोक्यात होती आणि ती प्रत्यक्ष सिनेमात उतरवली असल्याचे निर्मात्यांनी सांगितले. 'तेज रफ्तार' हा सिनेमाच नाही तर सिनेमातील अनेक सीन रसिकांना अंतर्मुख करतील असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. समीर सोनी, हृषिता भट्ट, सिद्धार्थ निगम, मुकेश ऋषी, सतीश कौशिक, जन्नत झुबैर रहेमानी यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत.