Join us  

'गुलाबो सिताबो', पिपली लाईव्ह' फेम ज्येष्ठ अभिनेत्री फारुख जफर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 2:36 PM

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री फारूख जफर यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले.

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री फारूख जफर यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले. फारूख जफर 'गुलाबो सिताबो' चित्रपटासाठी ओळखल्या जातात. त्यांची मोठी मुलगी मेहरु जफरने त्याच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की आईची तब्येत ठीक नाही. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांना लखनऊच्या सहारा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी सायंकाळी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली आहे. फारूख जफर यांच्या पश्चात त्यांना मेहरु आणि शाहीन या दोन मुली आहेत.

मेहरू जफर म्हणाल्या, श्वास घेण्यात अडचण येत असल्यामुळे त्यांना ४ ऑक्टोबर रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यांचे फुफ्फुस त्यांना देण्यात आलेला ऑक्सिजन घेण्यास असमर्थ होते. संध्याकाळी ६ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

फारुख जफर यांचा नातू शाज अहमद यांनी ट्विटरवर लिहिले की, माझी आजी आणि स्वातंत्र्य सेनानी, माजी एमएलसी एस एम जफर यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री फारूख जफर यांचे आज संध्याकाळी लखनऊमध्ये निधन झाले.फारूख जफर १९६३ साली लखनऊ विविध भारतीमध्ये रेडिओमध्ये उद्घोषिका होत्या. त्यांनी १९८१ मध्ये 'उमराव जान' चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्यात त्यांनी रेखाच्या आईची भूमिका साकारली होती. त्यांनी आमिर खानच्या 'पीपली लाईव्ह' आणि शाहरुख खानसोबत 'स्वदेस' या चित्रपटातही काम केले. याशिवाय त्या 'सुलतान'मध्येही दिसल्या होत्या. 'गुलाबो सिताबो'मध्ये त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या पत्नी फातिमा बेगमची भूमिका साकारली होती.'गुलाबो सिताबो 'च्या लेखिका जुही चतुर्वेदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चन