Join us  

2 तासांत स्फोट होणार... ! जेव्हा सलमानच्या घरात बॉम्ब असल्याचा ईमेल येतो...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 12:16 PM

बॉलिवूड अभिनेता सलमान खान राहत असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये बॉम्ब असल्याचा एक ईमेल आला आणि एकच खळबळ माजली.

ठळक मुद्देपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 16 वर्षांच्या मुलाने हा खोटा ई-मेल पाठवला होता.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान राहत असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये बॉम्ब असल्याचा एक ईमेल आला आणि एकच खळबळ माजली. होय, 2 तासांत बॉम्बस्फोट होणार. थांबता येत असेल तर थांबवा... असे या ईमेल लिहिले होते. हा ईमेल वाचला आणि मुंबई पोलिसांचे धाबे दणाणले.हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, 4 डिसेंबरला पोलिसांना हा ईमेल पाठवला गेला आणि हा ईमेल मिळताच मुंबई पोलिसात खळबळ माजली.  पोलिसांनी बॉम्बशोधक पथकासह तात्काळ सलमानच्या ‘गॅलेक्सी’ या घराकडे धाव घेतली. यावेळी सलमान त्याच्या घरी नव्हता. परंतु, यावेळी सलमान खानचे आई-वडील आणि बहिणी गॅलक्सीमध्ये होते. पोलिसांनी ताबडतोब या सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलविले. त्यानंतर बॉम्बशोधक पथकाने गॅलक्सीमध्ये 4 तास शोध घेतला.

वांद्रे पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार , ईमेल मिळताच पोलिसांनी सलमानच्या घरासह इमारतीचा ताबा घेतला. इमारतीच्या कानाकोप-याचा तपास केला. परंतु, कोठेही बॉम्ब आढळला नाही. त्यानंतर कुठे  सलमानच्या कुटुंबियांना पुन्हा गॅलेक्सी येथील निवासस्थानी आणले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 16 वर्षांच्या मुलाने हा खोटा ई-मेल पाठवला होता.  उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे राहणा-या या मुलाने याआधीही जानेवारी महिन्यात गाझियाबाद पोलिसांना स्थानकात खोटा मेल पाठवला होता. याची माहिती मिळताच मुंबई पोलिसांची एक टीम गाझियाबादला रवाना झाली. या टीमला संबंधित मुलगा सापडला नाही. पण त्याचा मोठा भाऊ हजर होता. तो वकील आहे. त्याने आपल्या लहान भावाला घरी बोलवले. तो येताच, पोलिसांनी त्याला मुंबई पोलिसांसमोर हजर होण्याचे नोटीस बजावले.  

टॅग्स :सलमान खान