Join us

किस्सा पहिल्या ऑनस्क्रीन ‘किस’चा, 'या' अभिनेत्रीने रुपेरी पडद्यावर केला पहिला किसिंग सीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 13:34 IST

कृष्णधवल (ब्लॅक अँड व्हाईट) चित्रपटाच्या जमान्यात किसिंग आणि बोल्ड सीन्स पाहायला मिळत नव्हते. तरीही त्याच काळात एका अभिनेत्रीने एक किस केला आणि चित्रपटसृष्टी पूर्णपणे बदलून गेली.

बोल्ड सीन, किसिंग हे आजच्या चित्रपटात सर्रास पाहायला मिळतं. रसिकांनाही यांत काहीही वावगं वाटत नाही. बोल्ड सीन आणि किसिंग सीनशिवाय चित्रपट पूर्णच होऊ शकत नाही. मात्र चित्रपटसृष्टीचा सुरुवातीचा काळ असा नव्हता. त्या काळात किसिंग सीन्स आणि बोल्ड सीन्सची कुणीही कल्पना करू शकत नव्हतं. मात्र काळ जसा पुढे गेला तशा चित्रपटसृष्टीत बदल होत गेले. हळूहळू या गोष्टी चित्रपटात दिसू लागल्या. कृष्णधवल (ब्लॅक अँड व्हाईट) चित्रपटाच्या जमान्यात किसिंग आणि बोल्ड सीन्स पाहायला मिळत नव्हते. तरीही त्याच काळात एका अभिनेत्रीने एक किस केला आणि चित्रपटसृष्टी पूर्णपणे बदलून गेली. 

अभिनेत्री देविका राणी आणि हिमांशू राय यांची भूमिका असलेला 'कर्मा' चित्रपट १९३३ साली रुपेरी पडद्यावर झळकला. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत रसिकांच्या भेटीला आलेला हा चित्रपट त्या काळात बराच हिट झाला. 'कर्मा' हिट होण्यामागे विविध गोष्टी असल्या तरी त्या चित्रपटातील पहिल्यावहिल्या किसिंग सीनने धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात अभिनेत्री देविका राणी यांनी पहिला किसिंग सीन दिला. 

या चित्रपटातील एक किसिंग सीन हा चार मिनिटांचा होता. त्यानंतर देविका यांनी ३५ वेळा किसिंग सीन दिले. हे सीन त्याकाळी सर्वात बोल्ड सीन म्हणून ओळखले गेले होते. विशेष म्हणजे देविका राणी आणि हिमांशू रॉय यांच्या या सीनची रसिकांमध्ये प्रचंड चर्चा रंगली होती. या सीनमुळे देविका राणी हिंदी चित्रपटसृष्टीत किसिंग सीन देणाऱ्या त्या पहिल्या अभिनेत्री ठरल्या. त्यांच्या या सीननंतर चित्रपटांमध्ये किसिंग सीन देण्यास अभिनेत्री सहज तयार होऊ लागल्या.