Join us  

विवाहित फिरोज खान एअर होस्टेसच्या प्रेमात झालेले वेडे, पत्नी आणि मुलांचा पडला होता विसर; 10 वर्षांनी परतले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 12:35 PM

विवाहित असूनही एका एअर होस्टेसवर ते असे काही भाळले होते, की त्यांनी तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता.

बॉलिवूडमध्ये ७०-८०च्या दशकात अनेक चित्रपट सेलिब्रिटींनी आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य केले. असे बरेच कलाकार होते ज्यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटाने इतके प्रभावित केले की लोकांना ते पात्र अनेक वर्षे लक्षात राहिले.  ऐंशीच्या दशकातील स्टायलिश अभिनेत्यांपैकी एक असलेले फिरोज खान.फिरोज खान यांचा जन्म  25 सप्टेंबर 1939 रोजी  बेंगळुरूमध्ये झाला. बॉलिवूडमध्ये कधीकाळी ‘काऊबॉय’ नावाने ओळखले जाणारे अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून प्रसिद्ध होते. 

प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे फिरोज खान प्रचंड चर्चेत राहिले. त्यांच्या लव्ह अफेअरचे किस्से तर चांगलेच गाजले होते. विवाहित असूनही एका एअर होस्टेसवर ते असे काही भाळले होते, की त्यांनी तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता.

 1965 रोजी फिरोज खान यांनी सुंदरीसोबत लग्न केले. हे लव्ह मॅरेज होते. लग्नानंतर पाच वर्षांनी फिरोज व सुंदरी यांची पहिली मुलगी लैलाचा जन्म झाला. त्यानंतर काही वर्षांनी फरदीनचा जन्म झाला.  संसार सुखात सुरु होता. पण लग्नानंतर अचानक एअर होस्टेस ज्योतिका त्यांच्या आयुष्यात आली. ज्योतिकाला पाहताच फिरोज तिच्यावर असे काही फिदा झाले की, तिच्यासाठी पत्नी सुंदरीला सोडायलाही ते तयार होते. फिरोज खान विवाहित आहेत, हे माहित असूनही ज्योतिकाही त्यांच्या प्रेमात गुरफटली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. दोघांच्या अफेअरची बातमी सुंदरीच्या कानापर्यंत पोहोचलीच. साहजिकच तिने विरोध केला. पण फिरोज खान कुणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. पत्नीने विरोध करताच फिरोज सुंदरी व मुलांना सोडून ज्योतिकासोबत बेंगळुरुमध्ये लिव्ह इनमध्ये राहायला लागले. एक नाही दोन नाही तर तब्बल दहा वर्षे ते ज्योतिकासोबत राहिले. पण आता ज्योतिकाला या नात्याला नाव हवे होते. फिरोज यांच्याशी लग्न थाटून तिला संसार करायचा होता. त्यामुळे तिने फिरोज यांच्याकडे लग्नासाठी तगादा सुरु केला. पण फिरोज खान लग्नासाठी तयार नव्हते. तिने लग्नासाठी विचारताच फिरोज टाळाटाळ करू लागले. अखेर ज्योतिकाला कळायचे ते कळले आणि तिने फिरोज यांच्यापासून कायमचे नाते तोडण्याचे ठरवले.

ज्योतिका  फिरोज यांच्यासोबतचे नाते तोडून कायमची लंडनला निघून गेली. ज्योतिका सोडून गेल्यावर फिरोज पुन्हा पत्नीकडे परतले.पण आता या वैवाहिक नात्याला अर्थच उरला नव्हता. पती-पत्नीच्या नात्यातील ओलावा कधीच संपला होता. फिरोज खान कुटुंबाकडे परतले होते. पण कुटुंबासोबतचे त्यांचे नाते कधीच पूर्ववत होऊ शकले नाही. सुंदरी यांनी फिरोज यांना घटस्फोट दिला होता. 27 एप्रिल 2009 रोजी फिरोज खान यांचं कर्करोगाने निधन झालं.

टॅग्स :फिरोज खान