Join us  

 तुझं वाढतं वय पाहून वाईट वाटतं...; चाहत्याच्या कमेंटला कोंकणाचं ‘स्मार्ट’ उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2021 5:04 PM

एका चाहत्याने कोंकणाचं कौतुक केलं, पण सोबत तिच्या वाढत्या वयावरून तिला हळूच डिवचलं....

ठळक मुद्देलोकप्रिय अभिनेत्री असलेल्या कोंकणाला ‘मिस्टर अँण्ड मिसेस अय्यर’साठी अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. यानंतर कोंकणा 2005 साली ‘पेज थ्री’ चित्रपटात चमकली.

पेज 3, ओमकारा आणि  लाइफ इन ए मेट्रो या चित्रपटामधून आपलं अभिनय कौशल्य दाखविणारी अभिनेत्री म्हणजे कोंकणा सेन (Konkona Sen). कोंकणा तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. ‘इंदिरा’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं होतं. त्यानंतर २००० साली प्रदर्शित झालेल्या ‘ए जे आछे कन्या’ या बंगाली चित्रपटातून तिने ख-या अर्थाने कलाविश्वात पदार्पण केलं. या चित्रपटानंतर तिने ‘मिस्टर अँण्ड मिसेस अय्यर’ या चित्रपटातून सा-याचं लक्ष वेधलं. त्यानंतर तिचा प्रत्येक चित्रपट लोकप्रिय झाला. नुकतेच कोंकणाने  तिच्या लाडक्या डॉगीने ट्रेनिंग पूर्ण केल्याच्या आनंदात काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

यात कोंकणा ‘नो मेकअप लूक’मध्ये दिसली आणि काही लोकांनी नेमक्या या कारणावरून तिला ट्रोल करायला सुरूवात केली. अशाच एका युजरने कोंकणाचे कौतुक केले, पण सोबत तिच्या वाढत्या वयावरून तिला हळूच डिवचलं. पण कोंकणाने या युजरच्या कमेंटला असं काही उत्तर दिलं की, ती चर्चेत आली.

तालिब अली नावाच्या एका युजरने कोंकणाच्या वाढत्या वयाबद्दल दु:ख व्यक्त करणारी कमेंट केली. ‘तुझं वाढतं वय पाहून वाईट वाटतं. इंडस्ट्रीने तुझ्यासारख्या सर्वोत्तम अभिनेत्रीला योग्य न्याय दिला नाही. शाळेमध्ये तू माझी क्रश होतीस. एक थी डायन नंतर मला तुझे आणखी काही सिनेमे पाहायचे होते. तू उत्तम आहेस,’ असे या युजरने लिहिलं.    कोंकणाने या युजरच्या कमेंटला अगदी मस्त उत्तर दिलं. ‘तू वाईट वाटून घेऊ नको. तरुणीपणी मरण्यापेक्षा वय वाढणं जास्त बरं...,’ असं तिने लिहिलं. तिचे हे उत्तर पाहून अनेकांनी कोंकणाचं कौतुक केलं.  लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या कोंकणाला ‘मिस्टर अँण्ड मिसेस अय्यर’साठी अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. यानंतर कोंकणा 2005 साली ‘पेज थ्री’ चित्रपटात चमकली. या चित्रपटामुळे तिची हिंदी चित्रपट वतुर्ळात ओळख निर्माण झाली. या दरम्यान तिने ‘वेक अप सिड’ चित्रपटात रणबीर कपूरसोबत रोमान्स केला. फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोंकणाने मिळवला आहे. 2006 साली  ओंकारा आणि 2007 साली  लाइफ इन ए मेट्रो या चित्रपटांसाठी कोंकणाला सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला होता.  

टॅग्स :कोंकणा सेन शर्मा