Join us  

बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री अभिनयासोबतच करणार आता शेती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 1:38 PM

ही अभिनेत्री तिच्या चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र असली तरी ती वेळात वेळ काढून आता व्यवसायिक शेती करण्याचा विचार करत आहे.

ठळक मुद्देयामी लवकरच काही दिवसांसाठी हिमाचल प्रदेशला जाणार असून तिथे ती व्यवसायिक शेती करणार आहे आणि यासाठी ती सध्या व्यवसायिक शेतीसंबंधीत असलेल्या तज्ज्ञांकडून माहिती गोळा करत आहे.

यामी गौतमने आयुष्यमान खुरानासह 'विक्की डोनर' सिनेमातून बॉलिवूड डेब्यु केला होता. तिच्या पहिल्याच चित्रपटातील भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. ‘काबील’, ‘सनम रे’,‘जुनूनियात’,‘विकी डोनर’,‘बदलापूर’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारून तिने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. 'काबिल' या चित्रपटातील हृतिक रोशन आणि तिच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा झाली होती. उरीः द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटातील तिच्या भूमिकेलाही रसिकांनी पसंती दर्शवली होती. यामीने खूपच कमी काळात तिची बॉलिवूडमध्ये एक खास जागा निर्माण केली आहे. तिचे वडील पंजाबी चित्रपटाचे दिग्दर्शक असून तिची बहीण सुरीली गौतमने पॉवर कट या चित्रपटाद्वारे काही महिन्यांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिला तिच्या बहिणीइतकी लोकप्रियता मिळवता आली नाही. 

यामी तिच्या चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र असली तरी ती वेळात वेळ काढून आता व्यवसायिक शेती करण्याचा विचार करत आहे. यामी सध्या तिच्या कामाच्या निमित्ताने मुंबईत राहात असली तरी ती मुळची हिमाचल प्रदेशमधील विलासपूरमधील आहे. ती लवकरच काही दिवसांसाठी हिमाचल प्रदेशला जाणार असून तिथे ती व्यवसायिक शेती करणार आहे आणि यासाठी ती सध्या व्यवसायिक शेतीसंबंधीत असलेल्या तज्ज्ञांकडून माहिती गोळा करत आहे. यामी हिमाचलमधील स्थानिक शेतकऱ्यांना भेटून त्यांना आधुनिक शेती करण्यावर भर देण्याबाबत सांगणार आहे. 

दिव्य मराठीने याबाबत वृत्त दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, यामी गौतम अनेकवेळा ऑरगॅनिक शेतीविषयी तिच्या मुलाखतींमध्ये तिचे मत मांडते. सध्या प्रत्येक पदार्थात भेसळ होत असून सेंद्रिय शेती हा एक चांगला पर्याय असल्याचे तिचे म्हणणे आहे. सध्या शेतीत अनेक नवीन उपकरणं येत आहेत आणि या सगळ्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांसोबत मिळून तिने व्यवसायिक शेती करण्याचा विचार केला आहे. ती हिमाचलमधील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीविषयी मार्गदर्शन करणार आहे. यामी गौतम सध्या बाला या चित्रपटाचे चित्रीकरण करत असून या चित्रपटात आयुषमान खुराणा, भूमी पेडणेकर, जावेद जाफरी, सौरभ शुक्ला यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

टॅग्स :यामी गौतम