Join us  

 ‘सूरमा भोपाली’ जगदीप यांनी केली होती तीन लग्न, अशी होती पर्सनल लाईफ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 10:29 AM

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते व कॉमेडियन जगदीप जाफरी यांनी वयाच्या 81 व्या वर्षी अंतिम श्वास घेतला.

ठळक मुद्देजगदीप यांचा जन्म 29 मार्च 1939 रोजी ब्रिटिश इंडिया इथे दतिया सेंट्रल प्रोव्हिंगमध्ये झाला होता. त्यांनी अनेक चित्रपटांत काम केले आहे.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते व कॉमेडियन जगदीप जाफरी यांनी वयाच्या 81 व्या वर्षी अंतिम श्वास घेतला. जगदीप दीर्घकाळापासून आजारी होते. बुधवारी त्यांचे निधन झाले. आज गुरुवारी सकाळी त्यांचा दफनविधी पार पडला.   जगदीप यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्यांच्या अभिनयाची जादू पसरवली आहे. ‘शोले’ चित्रपटातील सूरमा भोपालीच्या व्यक्तिरेखेमुळे त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली होती. त्याचे खरे नाव सय्यद इश्तियाक जाफरी होते प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरी हा जगदीपचा यांचा मुलगा आहे.

‘शोले’ चित्रपटातील सूरमा भोपालीची भूमिका त्यांना कशी मिळाली, याचा एक रोचक किस्सा आहे. जगदीप यांनी स्वत: एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. त्यांनी सांगितले होते की, सलीम आणि जावेद यांच्या ‘सरहदी लुटेरा’ या सिनेमात मी कॉमेडीयन होतो. माझे डायलॉग खूप मोठे होते. मी सलीम यांच्याकडे गेलो आणि हे डायलॉग खूप मोठे आहे, काही तरी कर असे त्याला म्हणालो. यावर त्याने मला जावेदकडे जायला सांगितले. मी जावेदकडे गेलो आणि त्याला माझी अडचण सांगितली. त्याने काय केले तर माझा डायलॉग पाचच वाक्यांत पूर्ण केला. मी खूश झालो. कमाल केलीस यार, तू तर खूप चांगला लेखक आहेस असे मी यावर त्याला म्हणालो. यानंतर आम्ही संध्याकाळी एकत्र बसलो होतो. शायरीची मैफिल रंगली होती. याचदरम्यान क्या जाने, किधर कहां कहां से आ जाते है, असे जावेद म्हणाला. यावर ‘अरे ये क्या कहां से लाए हो,’ असे उत्स्फूर्तपणे मी म्हणालो. यानंतर ही भोपाळच्या महिलांची शैली असल्याचे त्याने सांगितले. या घटनेनंतर 20 वर्षांनी ‘शोले’ चे काम सुरु झाले. मला यात काम मिळेल अशी माझी अपेक्षा होती. पण मला कुणीच बोलावले नाही. मग अचानक एक दिवशी रमेश सिप्पी यांचा फोन आला. शोलेमध्ये काम करशील असे त्यांनी मला विचारले. मी हैरान होतो आणि इथून सूरमा भोपाली बनण्याचा प्रवास सुरु झाला.

 

जगदीप यांच्या पर्सनल लाईफबद्दल सांगायचे तर त्यांनी 3 लग्न केली होती. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव नसीम बेगम आहे. दुस-या पत्नीचे नाव सुघ्न बेगम व तिस-या पत्नीचे नाव नजीमा आहे.जगदीप यांना एकूण सहा मुलं. पहिल्या पत्नीपासून त्यांना हुसैन जाफरी, शकीरा शफी आणि सुरैय्या जाफरी अशी तीन मुलं आहेत. दुस-या पत्नीपासून जावेद जाफरी व नावेद जाफरी अशी दोन मुलं आहेत. तिस-या पत्नीपासून त्यांना मुस्कान नावाची मुलगी आहे.यापैकी जावेद जाफरी आणि नावेद जाफरी बॉलिवूडमध्ये नाव कमावले. जावेद जाफरीही वडिलांप्रमाणे वेगळ्या अंदाजासाठी ओळखला जातो.

जगदीप यांचा जन्म 29 मार्च 1939 रोजी ब्रिटिश इंडिया इथे दतिया सेंट्रल प्रोव्हिंगमध्ये झाला होता. त्यांनी अनेक चित्रपटांत काम केले आहे. पण 1994 च्या ‘अंदाज अपना अपना’, 1975 मधील ‘शोले’ आणि 1972 मधील ‘अपना देश’ मधील त्यांच्या अभिनयाने चाहत्यांमध्ये त्यांची एक वेगळीच छाप होती. 

टॅग्स :जावेद जाफरी