Join us  

"२ ऑक्टोबर को विजय साळगावकरने बॉडी कहाँ दफनाई ये मुझे...", 'दृश्यम' फेम मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 10:56 AM

२ ऑक्टोबर निमित्ताने 'दृश्यम २' फेम मराठी अभिनेत्याने खास पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

२ ऑक्टोबर हा दिवस सर्वत्र महात्मा गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. पण हा दिवस एका वेगळ्या कारणामुळेही चर्चेत असतो. २ ऑक्टोबर उजाडला की सुरू होते विजय साळगावकरची गोष्ट. दरवर्षी सोशल मीडियावर त्याचे मीम्सही फिरतात. २०१५ साली प्रदर्शित झालेल्या 'दृश्यम' या चित्रपटाने प्रेक्षकांना वेडं करून सोडलं होतं. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत होता. त्याने विजय साळगावकरची भूमिका साकारली होती. 

गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात या चित्रपटाचा सीक्वल प्रदर्शित झाला होता. 'दृश्यम' प्रमाणेच 'दृश्यम २' देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या चित्रपटात अजय देवगण, तबू, श्रीया सरन, इशिता दत्ता, अक्षय खन्ना यांच्याबरोबरच मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ बोडकेही झळकला होता. सिद्धार्थने या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. आज २ ऑक्टोबर निमित्त सिद्धार्थने या चित्रपटातील काही गोड आठवणी शेअर केल्या आहेत. 

सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन 'दृश्यम २' मधील कलाकारांबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोला त्याने दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. "२ ऑक्टोबर की रात को विजय साळगावकरने बॉडी कहाँ दफनाई थी मै जानता है", असं कॅप्शन सिद्धार्थने या पोस्टला दिलं आहे. त्याच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी तसेच चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत. 

'दृश्यम' चित्रपट एका मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. २०१३ साली या मल्याळम चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित करण्यात आला होता. प्रसिद्ध अभिनेता मोहनलाल या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. त्यानंतर २०२१मध्ये 'दृश्यम २' हा मल्याळम भाषेतील सीक्वल प्रदर्शित झाला होता. 

टॅग्स :दृश्यम 2अजय देवगणमराठी अभिनेता