जिस देश में गंगा रहता है, वेलकम या चित्रपटात झळकलेली ही अभिनेत्री आठवतेय ना. या अभिनेत्रीचे नाव आहे सुप्रिया कर्णिक. मराठमोळ्या असलेल्या सुप्रियाचा मुंबईत जन्म झाला. १९९६ सालच्या तिसरा डोळा या मराठी मालिकेत ती अभिनेते रमेश भाटकर यांच्यासोबत झळकल्या होत्या. या मालिकेतून त्यांना लोकप्रियता मिळाली होती. याशिवाय ती अनेक हिंदी मालिका आणि चित्रपटात झळकली आहे.
अभिनेत्री सुप्रिया कर्णिक मुंबईतच लहानाची मोठी झाली.आई वडील आणि दोन मोठ्या बहिणी असे त्यांचे छोटंसे कुटुंब. लहानपणापासूनच ती खूप डॅशिंग होती. दोघी बहिणी मोठ्या असल्या तरी कुणी त्यांची छेड काढली तर सुप्रिया त्यांच्या मदतीला धावून जायची त्यामुळे सुरुवातीपासूनच सुप्रिया टॉम बॉय म्हणून ओळखली जायची.
दहावी नंतर सुप्रियाने मुलांचे ट्युशन घेतले, दुकानात काम केले, टायपिस्ट, शेअर मार्केट, रिअल इस्टेटमध्येही काम केले. एवढेच नाही तर टायपिस्ट, सेक्रेटरी, कार रिपेअरिंग अशी सर्व कामे केली. पुढे सौदी अरेबियाला काही वर्षे बुरखा घालून एअर होस्टेसचे काम केले. मात्र तेथील कामला कंटाळून ती पुन्हा भारतात परतली.
पुन्हा मालिकांत काम करण्याची इच्छा झाली आणि काम मिळाले. शांती, वो रेहनेवाली मेहलों की, कानून, तेहकीकात अशा मालिकांमध्ये ती झळकली आहे.
तर बेवफा, राजा हिंदुस्थानी, यादे, जोडी नंबर १, ताल, जिस देश मी गंगा रहता है, वेलकम बॅक अशा जवळपास ५०हून अधिक हिंदी चित्रपटात ती दिसली आहे. लेक लाडकी या मराठी चित्रपटातही काम केले आहे.