Join us  

नवाझुद्दीन सिद्दीकीच्या 'सिरीयस मॅन'मधील कामाची दिग्दर्शक सुधीर मिश्रांनी केली प्रशंसा

By तेजल गावडे | Published: October 12, 2020 10:46 PM

अनुराग कश्यप, दिव्या दत्त, अनुभव सिन्हा, शेखर कपूर यांसारख्या सेलिब्रेटींनी 'सिरीयस मॅन'साठी नवाजुद्दीन सिद्दीकीचे कौतुक केले.

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याने अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीने रसिकांच्या मनात घर केले आहे. नुकतीच त्याची नेटफ्लिक्सवर सिरीयर मॅन हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे व अभिनयाचे सर्वत्र कौतूक होत आहे. हे पाहून दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांनीही सिरीयस मॅनमधील अयान मणीच्या भूमिकेबद्दल नवाझचे कौतुक केले आहे.

अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी यांचे कौतुक करताना सुधीर मिश्रा म्हणाले, “नवाज एक हुशार अभिनेता आहे! तो एक अभिनेता म्हणून खूपच अस्खलित आणि पारदर्शक आहे आणि कथा सांगण्यात अजिबात अडथळा आणत नाही. चतुराईने आणि इतकी सुंदरपणे त्याच्या पात्रात समरस होण्याची त्याची क्षमता अप्रतिम आहे. त्याला एखाद्या सीनचे मूल्य नेहमीच समजते आणि कधीकधी तो स्वेच्छेने तो सीन आपल्या सह-अभिनेत्याला देतात. नवाजुद्दीन सिद्दीकी सारख्या अभिनेत्याबरोबर काम करण्याचा मला उत्तम अनुभव मिळाला ”

एवढेच नाही ! नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या उत्तम अभिनयाबद्दल मनोरंजन क्षेत्रातील नामांकित मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले आहे. अनुभव सिन्हा यांनी ट्विट केले की, तुम्हाला व्यंगात्मक आणि विनोदातील सटायर अनुभवायचा आहे का? तुम्हाला याआधीही कधीही न पाहिलेला नवाझुद्दीन सिद्दीकी पाहायचा आहे का? तुम्हाला मुख्य प्रवाहातील मॅव्हरिक दिग्दर्शक पहायचे आहेत?

अनुराग कश्यपने ट्विटवर सिरीयस मेन लिहित लव्हचे सिम्बॉल टाकले आहे.

दिव्या दत्ताने ट्विटरवर लिहिले की, #the seriousmen मनापासून आवडला. व्यंगात्मकता अतिशय उत्तम. @IAmSudhirMishra तुम्ही दिलेल्या या रंगछटा कोणीही दुसरे देऊ शकत नाही आणि नवाझुद्दीन तू खूप उत्तम काम केले आहेस, अर्थात नेहमी सारखेच!! आणि खूप सुंदर टीम! 

शेखर कपूरने म्हटले की, अक्षत दासने केलेल्या मासूमनंतर बहुधा बाल कलाकारांची सर्वोत्कृष्ट कामगिरी, सुधीर मिश्रा आजवरचे तुमचे सर्वोत्कृष्ट काम, नवाझुद्दीन पुन्हा एकदा सिद्ध करून दाखलेस की सामन्यातील असामान्य आहेस #seriousmen @manujosephsan यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपट एकदा पाहावा असाच आहे. सिरीयस मॅन. 

सुधीर मिश्रा दिग्दर्शित सिरीअस मॅन चित्रपट तामिळ दलित वडिलांच्या जीवनाभोवती गुंफला आहे.  ज्याची आपल्या मुलाने रूढी मोडण्याची आणि जीवनात यशस्वीतेची नवीन उंची गाठावी अशी इच्छा आहे आणि नवाझुद्दीन सिद्दीकी, श्वेता बसू प्रसाद, नासार आणि इंदिरा तिवारी यांच्यासह इतर कलाकारांनी यात काम केले आहे.

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकीनेटफ्लिक्सअनुराग कश्यपसुधीर मिश्रादिव्या दत्ता