Join us  

‘विलेज रॉकस्टार्स’च्या प्रमोशनसाठी रिमा दास यांनी सरकारला मागितले इतके कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 9:48 PM

रिमा दास यांनी ‘विलेज रॉकस्टार्स’च्या प्रमोशनसाठी सरकारकडे विशेष निधीची मागणी केली आहे.

दिग्दर्शक रिमा दास यांचा ‘विलेज रॉकस्टार्स’ हा आसामी चित्रपट अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आॅस्करवारीसाठी पद्मावत, राजी, पीहू, कडवी हवा आणि न्यूड यांसारख्या चित्रपटांना मागे टाकत ‘विलेज रॉकस्टार्स’ या चित्रपटाने बाजी मारली आहे. आॅस्कर पुरस्कारांच्या सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटांच्या विभागासाठी भारताकडून या चित्रपटाची निवड झाली. याचदरम्यान रिमा दास यांनी ‘विलेज रॉकस्टार्स’च्या प्रमोशनसाठी सरकारकडे विशेष निधीची मागणी केली आहे.रिमा दास यांनी इंटरनॅशनल प्रमोशनसाठी सरकारकडे कमीत कमी ३ कोटी रूपयांची मागणी केली आहे. आॅस्कर पुरस्काराच्या सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा विभागासाठी भारताकडून ‘विलेज रॉकस्टार्स’ची निवड होणे, माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. पण याच्या इंटरनॅशनल प्रमोशनसाठी सरकारने पुरेसा निधी द्यावी, अशी अपेक्षा आहे. आसाम सरकारने यासाठी ५० लाखांचे योगदान दिले आहे. पण इतक्याने भागणारे नाही. सरकारने कमीत कमी ३ कोटी रूपयांची मदत द्यावी, असे मीडियाशी बोलताना त्या म्हणाल्या.

‘विलेज रॉकस्टार्स’ हा चित्रपट एका १० वर्षांच्या धुनु नामक मुलीची कथा आहे. स्वत:चे गिटार खरेदी करण्याचे तिचे स्वप्न असते़ आपल्या आजुबाजूच्या मुलांना एकत्र करून ती ‘द रॉकस्टार्स’ नावाचा म्युझिक बँड बनवू इच्छिते. भनिता दास आणि बसंती दास यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. छोट्या बजेटच्या या चित्रपटाला डिजिटल कॅमेऱ्याने शूट केले गेले आहे. सेटवर कुठलाही प्रोफेशन क्रू नसताना हा चित्रपट शूट करण्यात आला. याबद्दल रिमा दास यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, माझ्याकडे चित्रपट बनवण्यासाठी केवळ एक डिजिटल कॅमेरा आणि एक कथा केवळ या दोनच गोष्टी होत्या. या दोनचं गोष्टीच्या भरवशावर चित्रपट पूर्ण करावा लागेल, हे मला ठाऊक होते.

टॅग्स :ऑस्कर