Join us  

शेतकरी विष पित होता तेव्हा...; आंदोलन की पिझ्झा पार्टी म्हणणाऱ्या ट्रोलर्सला दिलजीत दोसांजचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 3:11 PM

सोशल मीडियावर आंदोलनापेक्षा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेली ‘शाही’ व्यवस्थेची जोरदार चर्चा आहे.

ठळक मुद्देपिझ्झा खाणा-या शेतकऱ्यांना ट्रोल करणा-यांना अभिनेत्री स्वरा भास्कर हिने जोरदार प्रत्युत्तर दिले.

नवीन कृषी कायदे  रद्द करण्याची मागणी घेऊन शेकडो शेतकरी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहेत.   मात्र सध्या सोशल मीडियावर आंदोलनापेक्षा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसाठीच्या पिझ्झाची चर्चा सुरु आहे. केवळ इतकेच नाही यावर टीकेची झोडही उठत आहे. आता या टीकाकारांना अभिनेता दिलजीत दोसांज व अभिनेत्री स्वरा भास्करने खरमरीत उत्तर दिले आहे.

दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी पिझ्झा खात असल्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावरून काही लोकांनी आंदोलकांवर पुरवण्यात येत असलेल्या या ‘शाही’ व्यवस्थेवर टीका केली होती. खरे शेतकरी सध्या शेतीच्या कामात मग्न आहेत, मग हे कुठले शेतकरी?  पिझ्झा, ड्राय फ्रुट्स, चहा, दुध, अस्सल तूप लावलेली गरमा गरम रोटी, डाळ, स्वादिष्ट भाज्या, तंबूमध्ये आरामदायी बेडस, हे आहे आधुनिक काळातले आंदोलन, यही तो है अच्छे दिन ! , हे आंदोलन आहे की  पिकनिक, आंदोलन की पिझ्झा पार्टी  अशी टीका अनेक नेटक-यांनी केली होती.  

दिलजीतने दिले उत्तर

आंदोलकर्ते पिझ्झा खातांना दिसले म्हणून त्यांना ट्रोल करणा-या नेटक-यांना अभिनेता दिलजीतने जोरदार उत्तर दिले आहे. ‘शेतकरी विष पित होता तेव्हा त्याची चिंता नव्हती.  आता तो पिझ्झा खातोय तर त्याची न्यूज होतेय,’ असे ट्विट दिलजीतने केले. दिलजीतचे हे  ट्विट सध्या तुफान व्हायरल होत आहे. शेतकरी आंदोलनाचे समर्थकांनी हे ट्विट रिट्विट करण्याचा धडाका लावला आहे.यापूर्वी शेतकरी आंदोलनावर टीका करणा-या अभिनेत्री कंगना राणौतवर दिलजीत भडकला होता. यानंतर दोघांमध्येही ट्विटर वॉर रंगले होते. यामुळे दिलजीत ट्विटरवर ट्रेंड करत होता.

स्वरा भास्करनेही दिले प्रत्युत्तर

पिझ्झा खाणा-या शेतकऱ्यांना ट्रोल करणा-यांना अभिनेत्री स्वरा भास्कर हिने जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘जे शेतकरी गव्हाची शेती करतात ते गव्हापासून तयार झालेला पिझ्झा खाऊ शकत नाही का? त्यांचे पाय मेहनतीचे प्रतिक आहेत. त्यांच्या मेहनतीमुळेच देशातील जमीन सुपीक बनते. यांना देखील पायांचा मसाज करण्याचा अधिकार आहे. शेतक-यांना कायम दरिद्री आणि लाचार परिस्थितीतच पाहायची इच्छा असलेले आहेत तरी कोण? अशा आशयाचे ट्विट करुन स्वराने ट्रोलर्सला  प्रत्युत्तर दिले.

 

टॅग्स :दिलजीत दोसांझस्वरा भास्कर