Join us

​दिपक तिजोरीला पत्नी शिवानीने काढले घराच्या बाहेर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2017 14:06 IST

दिपक तिजोरीने नवव्दीच्या दशकात सडक, खिलाडी, जो जिता वही सिकंदर यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो अभिनयानंतर ...

दिपक तिजोरीने नवव्दीच्या दशकात सडक, खिलाडी, जो जिता वही सिकंदर यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो अभिनयानंतर दिग्दर्शन आणि निर्मितीकडे वळला. त्याने फरेब, टॉम डिक अँड हॅरी या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. तसेच तो बिग बॉसमध्येदेखील झळकला होता. गेल्या काही दिवसांपासून एका वेगळ्याच गोष्टीसाठी दिपक चर्चेत आहे. दिपकची पत्नी शिवानीने नुकतेच त्याला घराच्या बाहेर काढले आहे अशी जोरदार चर्चा आहे. दिपकचे एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध असल्याने त्याला घराच्या बाहेर काढण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. तो गेल्या काही दिवसांपासून त्याच्या मित्रांसोबत अथवा पेइंग गेस्ट म्हणून राहात असल्याचा दावा एका वेबसाईटने केला आहे. दिपकला शिवानी घरात घेत नसल्याने तो नुकताच एका काऊन्सिलरकडे गेला होता. पण तिथे गेल्यावर एक वेगळीच गोष्ट त्याच्या लक्षात आली आहे की, कायद्याने त्याचे आणि शिवानीचे लग्नच झालेले नाही. दिपकसोबत लग्न करण्याआधी शिवानीचे लग्न झालेले होते आणि तिने तिच्या पूर्व पतीला घटस्फोट न देताच दिपकसोबत लग्न केले होते. त्यामुळे हे लग्न कायद्याने वैध ठरत नाही असे काऊन्सिलरचे म्हणणे आहे. या दोघांना 21 वर्षांची मुलगीदेखील आहे. शिवानी ही एक फॅशन डिझायनर असून तिने पोटगीसाठी मागणी केली आहे. तिचा आणि त्यांच्या मुलीचा खर्च ती भागवू शकत नाही असे तिचे म्हणणे आहे. वांद्रेतील कोर्टात सध्या ही केस सुरू आहे. याविषयी दिपकने काहीही प्रतिक्रिया दिली नसली तरी शिवानीची बहीण गायिका कुनिका लालने एका वृत्तपत्राशी बोलताना याविषयी माहिती दिली आहे. ती सांगते, "दिपक आणि शिवानीमध्ये काही मतभेद सुरू असल्याचे खरे आहे. पण दिपक आजही त्याच्याच घरात राहात आहे. दिपकला घराच्या बाहेर काढल्याच्या अफवा कोण पसरवत आहे हेच मला कळत नाही. तसेच या दोघांचे लग्न अवैध आहे हे म्हणणे चुकीचे आहे. त्या दोघांना एक मुलगी असून ते अनेक वर्षं एकत्र राहात आहेत. या सगळ्या गोष्टीचा त्यांच्या मुलीवर फरक पडू शकतो याचा विचार मीडियाने करणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणत्याही पुराव्याशिवाय मीडियाने अशाप्रकारच्या गोष्टी लिहिणे टाळावे असे मला वाटते."