Join us  

Death Anniversary: बाबिलच्या आठवणीत आजही जिवंत आहे इरफान खान, म्हणाला - 'मी माझा आत्मा हरपला'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 12:39 PM

अभिनेता इरफान खानच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झाले. त्याचा मुलगा बाबिलने आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना बऱ्याच गोष्टी शेअर केल्या.

अभिनेता इरफान खानचे २९ एप्रिल, २०२० ला निधन झाले. आज त्याच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झाले. मात्र आजही त्याच्या निधनाच्या धक्क्यातून त्याचे कुटुंब सावरलेले नाही. नुकतेच त्याचा मुलगा बाबिलने आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना बऱ्याच गोष्टी शेअर केल्या. बाबिलने सांगितले की ते माझे वडीलच नाही तर बेस्ट फ्रेंड होते. मला दररोज त्यांची आठवण येते आणि स्वप्नातही मी त्यांनाच पाहतो.

बाबिल खानने पुन्हा एकदा वडील इरफान खानच्या साध्या व्यक्तिमत्त्वाच्या आठवणीला उजाळा दिला आहे. बाबिलने इरफानचा इंस्टाग्रामला फोटो शेअर केला आहे, ज्यात इरफान घरातील टेबल दुरूस्त करताना दिसतो आहे. या पोस्टमध्ये बाबिलने लिहिले की, माझ्या वडिलांमध्ये पूर्वीपासून रुजलेला एक वारसा आहे. त्यांची जागा कुणीच घेऊ शकत नाही. त्यांच्यासारखे कधीच कुणी करू शकत नाही. माझ्यासाठी तुम्ही सर्वात चांगले मित्र, साथी, भाऊ, वडील होतात. माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे. 

बाबिलने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत इरफान खानच्या आठवणींना उजाळा दिला. म्हणाला की, त्यांचे जाणे माझ्यासाठी खूप मोठे नुकसान होते. ते अचानक गेले आणि मला हे समजणे खूप कठीण गेले. सर्वांसाठी हे बोलणे खूप सोपे आहे की जीवनात पुढे जा पण जो अनुभव मी घेतला आहे तो तुम्ही घेऊ शकत नाही.

बाबिलने सांगितले की, त्यांच्यासारखा कुणीच मित्र नाही. वडीलच माझे सर्वात चांगले मित्र होते. मला माहित नाही की त्यांच्यासोबतचे नाते तुम्हाला मी कसे समजावून सांगू. मी माझा मित्र आणि माझी आत्मा हरपली आहे. जर तुम्ही आम्हाला कधी एकत्र पाहिले तर तुम्हाला आमचे बॉण्डिंग पाहून मी त्यांचा मुलगा आहे यावर विश्वासच बसणार नाही. आम्ही लहान मुलांसारखे भांडायचो.

बाबिल भावुक होऊन पुढे म्हणाला की, १५, २५ किंवा ३५ वर्षे जातील पण मला त्यांच्यासारखा मित्र शोधू शकणार नाही. त्यांना जाऊन एक वर्षे झाले आणि जवळपास प्रत्येक रात्री मी त्यांना माझ्या स्वप्नात पाहिले आहे आणि माझ्यासाठी तो सर्वात चांगला वेळ असतो त्यामुळे मला झोपेतून उठायला आवडत नाही.

टॅग्स :इरफान खान