Join us  

Death Anniversary: अन् महमूद यांनी राजेश खन्ना यांच्या थोबाडीत मारली!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 11:31 AM

हिंदी सिनेसृष्टीचे प्रसिद्ध विनोदवीर महमूद यांचा आज (२३ जुलै)  स्मृतीदिन आहे. २३ जुलै २००४ रोजी न्यूयॉर्क येथे महमूद यांचे निधन झाले होते.

ठळक मुद्दे हा किस्सा आहे १९७९ सालचा. ‘जनता हवलदार’ या सेटवर ही घटना घडली होती.

हिंदी सिनेसृष्टीचे प्रसिद्ध विनोदवीर महमूद  यांचा आज (२३ जुलै)  स्मृतीदिन आहे. २३ जुलै २००४ रोजी न्यूयॉर्क येथे महमूद यांचे निधन झाले होते. भूत बंगला, पडोसन, बॉम्बे टू गोवा, गुमनाम, कुंवारा बाप  यासह ३०० चित्रपटांमध्ये महमूद यांनी काम केले.   आपल्या पाच दशकांच्या फिल्मी करिअरमध्ये महमूद यांनी अनेक अविस्मरणीय भूमिका केल्या. प्रेक्षकांना खळखळून हसवले. पण हेच महमूद प्रत्यक्षात अतिशय रागिट स्वभावाचे होते. इतके की, एकदा त्यांनी सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याच थोबाडीत मारली होती.

 हा किस्सा आहे १९७९ सालचा. ‘जनता हवलदार’ या सेटवर ही घटना घडली होती. महमूद यांनी त्यांच्या ‘जनता हवलदार’ या चित्रपटासाठी राजेश खन्ना यांना साइन केले होते. त्याकाळात राजेश खन्ना सुपरस्टार होते. त्यांचे एक वेगळेच स्टारडम होते. महमूद यांच्या फार्म हाऊसवर चित्रपटाचे शूटिंग सुरु होते.

एकदिवस  महमूद यांच्या मुलाने राजेश खन्ना यांना बघितले आणि त्यांना नुसते हॅलो म्हणून तिथून निघून गेला. महमूद यांच्या मुलाने आपल्याला केवळ हॅलो म्हणून निघून जावे, ही गोष्ट राजेश खन्ना यांना खटकली. इतकी की, तो अपमान मानून राजेश खन्ना त्या दिवशी सेटवर कुणाशीही बोलले नाहीत. विशेष म्हणजे, त्या दिवसानंतर राजेश खन्ना कायम सेटवर उशीरा येऊ लागले. फॉर्महाऊसवर मुक्काम असतानाही ते सेटवर उशीरा पोहोचू लागले. महमूद या चित्रपटाचे दिग्दर्शक होते आणि चित्रपटात एक महत्त्वपूर्ण भूमिकाही करत होते. चित्रपटाचा हिरो उशीरा येऊ लागला म्हटल्यावर महमूद यांचाही खोळंबा होऊ लागला. एकदिवस महमूद यांचा संयम सुटला आणि राजेश खन्नांना त्यांनी जाम फैलावर घेतले. दोघांमध्येही असा काही वाद झाला की, महमूद यांनी राजेश खन्ना यांच्या थोबाडीत मारली.   तू सुपरस्टार असशील तुझ्या घरी. इथे तू हिरो आहेस. मी तुला पैसे दिले आहेत, त्यामुळे तुला वेळेत शूटिंग पूर्ण करावे लागले, असे त्यांनी राजेश खन्ना यांना सुनावले. या घटनेनंतर अख्ख्या सेटवर शांतता पसरली. पण एक मात्र झाले, या घटनेनंतर राजेश खन्ना वेळेत सेटवर येऊ लागले आणि ठरलेल्या दिवसांत चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले. 

टॅग्स :मेहमूदराजेश खन्ना