Join us

‘दंगल गर्ल्स’ सान्या मल्होत्रा आणि फातिमा शेखच्या मैत्रीमध्ये शाहरुख खानमुळे का पडली फूट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 11:18 IST

सान्या मल्होत्राचा शाहरुख खानच्या ‘मितवा’ गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे. शाहरुखनेही त्याची प्रशंसा केली आहे. मैत्रिणीचे असे कौतुक होताना पाहून मात्र फातिमा शेख चांगलीच नाराज झाली आहे. ते का? जाणून घेण्यासाठी वाचा...

‘दंगल’च्या स्वप्नवत यशामुळे सान्या मल्होत्रा आणि फातिमा शेख या दोन नवअभिनेत्रींच्या करिअरला चांगलीच उभारी मिळाली आहे. पहिल्याच चित्रपटात आमिर खानसोबत काम करतानाच बॉक्स आॅफिसवर ३५० कोटींपेक्षा जास्त गल्ला कमवून सर्वात यशस्वी हिंदी चित्रपटात झळकण्याची त्यांना संधी मिळाली आणि सर्व आयुष्यच बदलून गेले.रिअल लाईफ कुस्तीपटू गीता आणि बबीता फोगाट यांची भूमिका करणाऱ्या सान्या आणि फातिमा यांची मैत्री किती घट्ट आहे याचा प्रत्यय तर ‘कॉफी विथ करण’वर आलाच होता. आमिरसोबत सहभागी झालेल्या या सेलिब्रेटी चॅट शोमध्ये त्यांची बाँडिंग पाहून त्या किती चांगल्या ‘बेस्ट फ्रेंड्स’ आहे, असे वाटते.पण आता त्यांच्या मैत्रीमध्ये फूट पडली आहे. फातिमा तर सान्यावर एवढी नाराज झाली आहे की, तिने मैत्री संपली असे सार्वजनिकरीत्या जाहीर केले. आणि त्याला कारणीभूत दुसरा-तिसरा कोणी नसून खुद्द शाहरुख खान आहे. आता असे झाले तरी काय असेल? किंवा दोन अभिनेत्री कधीच मैत्रिणी असू शकत नाही वगैरे विचार जर तुमच्या डोक्यात आले असतील तर थांबा! कारण त्यांचे भांडण हे त्यांच्या मैत्रीचाच भाग असून फार गमतीशीर आहे. त्याचे झाले असे की, सान्याने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये ती शाहरुखच्या ‘मितवा’ गाण्यावर त्याची स्टाईल करताना दिसते. दिग्दर्शक नितेश तिवारींनी शूट केलेल्या छोटेखानी व्हिडिओमध्ये सान्या स्टेडियममध्ये किंग खानची सिग्नेचर पोज देतानाही दिसते. शाहरुखच्या एका फॅन क्लबने जेव्हा हा व्हिडिओ त्याच्या निदर्शनास आणून दिला तेव्हा त्याने लागलीच तो रिट्विट करून म्हटले की, ‘सान्या, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुझ्याकडून मला डान्स पुन्हा शिकायचा आहे.’ दस्तुरखुद्द शाहरुखने व्हिडिओला प्रतिसाद दिला हे पाहून तर सान्याचा आनंद गगनात मावेनसा झाला. तिने उत्तरादाखल ट्विट केले की, ‘सर, मेरा तो हॅपी न्यू इयर बन गया.’सान्याचा हा आनंद फातिमाला काही सहन झाला नाही. तिने खोटे खोटे नाराज होऊन ट्विटरवर लिहिले की, ‘ये देखने से पहले मैं मर क्यों नहीं गई. सान्या आजपासून आपली मैत्री संपली. ओके. बाय. #जेलस’सोशल मीडियावरचे त्यांचे असे प्रेमळ भांडण पाहून नेटिझन्सनाही खूप खुश झाले. या दोघींची केमिस्ट्री पाहून त्यांना घेऊन ‘दिल चाहता है’ किंवा ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’सारखी एखादी यारी-दोस्तीवाली फिल्म बनवली पाहिजे अशी मागणी होऊ लागली.