Join us  

बाबा, तुमची खूप आठवण येते...! वडिलांच्या आठवणीने रितेश देशमुख भावूक!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 9:45 PM

विलासरावांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुख आज वडिलांच्या आठवणीने भावूक झाला. वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त रितेशने भावूक ट्विट केले.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज सहावी पुण्यतिथी. सन २०१२ मध्ये आजच्याच दिवशी विलासराव यांनी जगाचा निरोप घेतला. विलासरावांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुख आज वडिलांच्या आठवणीने भावूक झाला. वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त रितेशने भावूक ट्विट केले. ‘मी आकाशााकडे बघतो आणि तुमच्याशी बोलतो. पण तुमचे शब्द मात्र मला ऐकू येत नाहीत. सहा वर्षे झालीत. तुम्ही गेल्यानंतर एक गोष्ट बदलली, ती म्हणजे सर्वकाही़ बाबा, तुमची खूप आठवण येते...’, असे रितेशने लिहिलेय.

रितेशच्या बॉलिवूड करियरमध्येही विलासरावांचा मोलाचा वाटा आहे. अनेकदा रितेशने याचा वारंवार उल्लेख केला आहे. विलासराव देशमुख यांचं महाराष्ट्राच्या किंबहुना देशाच्या राजकारणात वेगळं स्थान होत. सगळ्यांना आपलेसे आणि सगळ्यांशी आपुलकीने बोलणारे मुख्यमंत्री अशी त्यांची ओळख होती. त्यामुळे आजही रितेश देशमुख म्हटलं की विलासराव देशमुख यांचा मुलगा अशी ओळख रितेशची करुन दिली जाते. आपल्या वडिलांच्या नावाने आपण ओळखलो जातो याचा रितेशला अभिमान आहे. मात्र एकदा असा प्रसंग घडला की ज्यावेळी विलासरावांची ओळख अभिनेता रितेशचे बाबा अशी करुन देण्यात आली होती. खुद्द रितेशने एका मुलाखतीमध्ये याचा खुलासा केला होता.  नागपूरमध्ये 2007 साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा एक कार्यक्रम होता. त्यावेळी विलासरावांची लोकप्रियता पाहता मुख्यमंत्री ही ओळख कुणीही करुन दिली असती. मात्र त्यावेळी त्या सभेला उपस्थित पहिल्या रांगेतील काही तरुण विलासरावांकडे पाहून ते बघा रितेशचे वडील असे बोलल्याचं विलासरावांनी ऐकलं. हे शब्द ऐकून त्यावेळी खुद्द विलासरावही भारावले होते. कारण पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदी असताना कुणीतरी त्यांची ओळख रितेशचे वडिल अशी करुन दिली होती. त्यावेळी विलासरावांना आनंद झाला होता, असे रितेशने या मुलाखतीमध्ये सांगितले होते.  

टॅग्स :रितेश देशमुख