Join us  

कोरोनामुळे इंडस्ट्रीतील लोकांवर आलीय उपासमारीची वेळ, अशी आहे त्यांची भयाण स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 12:47 PM

आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून सिनेमांचे शूटिंग आणि प्रमोशनही काही काळ थांबवण्यात आले आहेत.

ठळक मुद्देसध्या चित्रीकरणच बंद असल्याने ज्युनिअर आर्टिस्टना काम मिळत नाहीये. त्यामुळे आता फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्पलॉईजने आणि गिल्ड प्रोड्यूसर असोसिएशनने मिळून या लोकांना दैनंदिन वापरात लागणारे अत्यावश्यक धान्याचे वाटप करण्याचे ठरवले आहे.

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून शाळा-कॉलेज बंद केले जात आहेत. तसेच सिनेमांचे शूटिंग आणि प्रमोशनही काही काळ थांबवण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर भारतातील अनेक राज्यात मॉल्स, थिएटर बंद करण्यात आले आहेत. चित्रीकरण बंद झाले असल्याने इंडस्ट्रीतील ज्युनिअर आर्टिस्टवर उपासमारीची वेळ आली आहे. स्पॉटबॉय, मेकअप आर्टिस्ट, लाईटमॅन, प्रोडक्शनशी संबंधित लोकांची सध्या अतिशय भयाण स्थिती आहे. 

या सगळ्याच लोकांना दिवसभर काम केल्यानंतर दिवसाचे पैसे मिळतात. पण सध्या चित्रीकरणच बंद असल्याने त्यांना काम मिळत नाहीये. त्यांच्या घरात शिजवायला अन्न देखील नसल्याने आता फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्पलॉईजने आणि गिल्ड प्रोड्यूसर असोसिएशनने मिळून या लोकांना दैनंदिन वापरात लागणारे अत्यावश्यक धान्याचे वाटप करण्याचे ठरवले आहे. 5000 कर्मचाऱ्यांना गोरेगावमधील फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये धान्याचे वाटप केले जाणार आहे. पाच दिवस तरी वाटप करण्याचा सध्या असोसिएशनचा विचार सुरू आहे. धान्यासोबत त्यांना काही पैसे देखील दिले जावेत यासाठी त्यांचा प्रयत्न असल्याने याबाबत ते काही निर्मात्यांशी चर्चा करत आहेत. 

अशोक पंडित यांनी ज्युनिअर आर्टिस्टना मदत करण्याचे आवाहन केल्यानंतर मधुर भांडारकर, सोनम कपूर, जावेद अख्तर, मनोज मुंतसीर, संजय गुप्ता, विवेक अग्निहोत्री, सलीम मर्चंट, अनुपम खेर, करणवीर बोहरा, टिस्का चोप्रा, निरमत कौर, सुधीर मिश्रा, अनुभव सिन्हा, अनुराग कश्यप यांसारखे इंडस्ट्रीतील लोक मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. सोशल मीडियावर या सगळ्यांनी या गोष्टीचे कौतुक केले असून मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. 

कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून बुधवारी या साथीला महारोगराई घोषित करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. आगामी दिवस आणि आठवड्यांमध्ये विषाणूबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या