Join us  

OMG! 58 जणांसोबत जॉर्डनमध्ये अडकून पडलाय साऊथचा हा सुपरस्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 11:41 AM

अशी केली मदतीची याचना...

ठळक मुद्देयोग्य वेळ येताच आम्ही भारतात परतू, असा विश्वास आहे,’ असे पृथ्वीराजने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

संपूर्ण जगभर कोरोनाने कहर केला आहे़ या प्रकोपापासून वाचण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. लोक आपआपल्या घरात कैद आहेत. तर अनेक लोक या लॉकडाऊनमुळे विदेशातही अडकून पडले आहेत. होय, मल्याळम अभिनेता पृथ्वीराज सुकुरामन व त्याच्या चित्रपटाचे 58 सदस्य जॉर्डनमध्ये अडकून पडले आहेत. पृथ्वीराजने स्वत: सोशल अकाऊंटवर ही माहिती दिली. यानंतर पृथ्वीराज व त्याच्या युनिटच्या या लोकांना भारतात सुरक्षित आणण्याची तयारी सुरु झाली.

जॉर्डनमध्ये ‘आदुजीवीथम’ या मल्याळम चित्रपटाचे शूटींग सुरु होते. अभिनेता पृथ्वीराज, चित्रपटाचे दिग्दर्शक ब्लेसी यांच्यासह 58 जणांचे युनिट या शूटींगसाठी जॉर्डनमध्ये मुक्काम ठोकून होते. पण कोरोनाच्या संकटामुळे हे सगळे जॉर्डनमध्ये अडकून पडले.

पृथ्वीराजने फेसबुकवर याबद्दलची माहिती दिली. ‘हॅलो, या कठीण काळात सर्वजण सुरक्षित राहण्याचे प्रयत्न करत असतील, अशी आशा करतो. 24 तारखेला जॉर्डनमध्ये आमच्या चित्रपटाचे शूटींग थांबवण्यात आले. पण यानंतर स्थिती काहीशी सुधारल्यानंतर आम्हाला पुन्हा शूटींगची परवानगी दिली गेली. मात्र लवकरच शूटींग रद्द करण्याचा नवीन आदेश आला. यानंतर माझ्यासकट माझी अख्खी टीम जॉर्डनमध्ये अडकून पडलीय. तूर्तास शूटींग पुन्हा सुरु होण्याची शक्यता नाही. अशात आम्हाला भारतात परतावे लागणार आहे. एप्रिलच्या दुस-या आठवड्यापर्यंत आम्ही जॉर्डनमध्ये शूट करणार होतो. सध्या आम्ही एका शिबीरात आहोत. आमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली गेलीय. पण यानंतर काय, याची चिंता आम्हाला लागली आहे. जगभरात अनेक ठिकाणी भारतीय अडकून पडले आहेत आणि भारतात परतण्याची आशा बाळगून आहेत. योग्य वेळ येताच आम्ही भारतात परतू, असा विश्वास आहे,’ असे पृथ्वीराजने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

टॅग्स :Tollywoodकोरोना वायरस बातम्या