Join us  

कोरिओग्राफर रेमो डिसूझाच्या अडचणीत वाढ, पोलिसांनी जप्त केला पासपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2020 12:32 PM

रेमो डिसूझाच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझाच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याच्यावर ५ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार गाझियाबाद पोलिसांनी रेमोचा पासपोर्ट जप्त केला आहे. रेमो डिसूझाच्या विरोधात सिहानी गेट पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सूत्रांच्या माहितीनुसार सत्येंद्र त्यागी नावाच्या एका व्यक्तीनं रेमो डिसूझाच्या विरोधात फसवणूकीची तक्रार दाखल केली होती. त्यागी यांचा आरोप आहे की, २०१३ मध्ये त्याची रेमो डिसूझाशी ओळख झाली होती.

काही दिवसांनी रेमोनं त्याचा ‘अमर मस्ट डाय’ चित्रपटात ५ कोटी रुपये गुंतवण्यास सांगितले होते. त्यागी यांचे म्हणणे आहे की रेमोनं त्यावेळी ही रक्कम दुपटीनं परत करतो असे आश्वासन दिले होते मात्र सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्याने मूळ रक्कमही परत केली नाही.

सत्येंद्र त्यागी यांनी त्यांचे पैसे परत मागितल्यावर १३ डिसेंबर २०१६ मध्ये प्रसाद पुजारी नावाच्या एका व्यक्तीकडून रेमोनं त्याला धमकी दिली. या पुजारीनं स्वतः अंडरवर्ल्डचा भाग असल्याचं सांगितलं. जर सत्येंद्रनं पुन्हा रेमोकडे पैशांची मागणी केली तर त्याला जीवे मारण्याची धमकी या व्यक्तीनं सत्येंद्र यांना दिली.

त्यानंतर सत्येंद्र त्यागी यांनी गाझियाबादच्या सिहानीगेट पोलिस स्टेशनमध्ये रेमो डिसूझाच्या विरोधात तक्रार दाखल केली.

टॅग्स :रेमो डिसुझानृत्यपासपोर्ट