‘नोटबंदी’वर आधारित चित्रपटातील सहा दृश्यांवर सेन्सॉरची कात्री!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2017 17:02 IST
मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर निर्माण झालेल्या अस्थिरतेवर आधारित ‘शून्यता’ या बांगला चित्रपटातील तब्बल सहा दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाच्या क्षेत्रीय कार्यालयाने ...
‘नोटबंदी’वर आधारित चित्रपटातील सहा दृश्यांवर सेन्सॉरची कात्री!!
मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर निर्माण झालेल्या अस्थिरतेवर आधारित ‘शून्यता’ या बांगला चित्रपटातील तब्बल सहा दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाच्या क्षेत्रीय कार्यालयाने कात्री चालविली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक शुवेंदु घोष यांनी सेन्सॉरचा निर्णय मान्य केल्याने आता या चित्रपटाच्या प्रदर्शनास हिरवा झेंडा दाखविण्यात आला आहे. याविषयी दिग्दर्शक घोष यांनी सांगितले की, सेन्सॉरने त्यांना चित्रपटातील सहा दृश्ये काढण्याचे स्पष्टपणे सांगितले होते. मी त्यांच्या सूचनेचे पालन करताना सहा दृश्ये काढून टाकली आहेत. सेन्सॉरने ज्या दृश्यांना कात्री लावली त्यात नोटबंदीनंतरच्या प्रभावाविषयीचे महत्त्वपूर्ण टप्पे दाखविण्यात आले होते. अंत्यसंस्कार, बडे मासे आणि आई-मुलांमधील संवादावर आधारित केलेला टीकात्मक संवाद यामध्ये होता. त्यामुळे सेन्सॉरने बीप, म्यूट किंवा दृश्ये वगळून टाकण्याबाबतचे पर्याय दिले होते.घोष यांनी सांगितले की, सेन्सॉरने जे काही सांगितले ते मला मान्य करावेच लागणार होते. त्यामुळे जनतेनेच माझे काम बघावे, अशी अपेक्षा करतो. तर सेन्सॉरच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, सेन्सॉरच्या अध्यक्षांनीच याबाबतचा निर्णय घेतला आहे. निरीक्षण समितीच्या अहवालानुसारच चित्रपटातील दृश्यांवर आक्षेप घेतला गेला. मात्र सेन्सॉरच्या या निर्णयामुळे आता चित्रपटाच्या टीमला पोस्टर डिझाइन आणि पोस्ट प्रॉडक्शनचे काम नव्याने करावे लागणार आहे. त्यामुळे चित्रपटाच्या रिलीज डेटवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच निर्मात्यांनी या चित्रपटाच्या रिलीज डेटबाबतचा अद्यापपर्यंत खुलासा केलेला नाही.