Join us  

तंबाखूच्या जाहिराती करणे सोड; कॅन्सर पीडित चाहत्याची अजय देवगणला विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 10:05 AM

अजय देवगणने तंबाखूची जाहिरात करावी, हे अनेक चाहत्यांना अद्यापही पचवता आलेले नाही. यावरून अजय सोशल मीडियावर ट्रोलही झाला. पण आता एका कॅन्सरपीडित चाहत्याने एक पाऊल पुढे जात, अजयला या जाहिराती न करण्याची विनंती केली आहे.

ठळक मुद्देराजस्थानमध्ये राहणा-या या कॅन्सर पीडित चाहत्याचे नाव नानकराम आहे. तो ४० वर्षांचा आहे.

अजय देवगणने तंबाखूची जाहिरात करावी, हे अनेक चाहत्यांना अद्यापही पचवता आलेले नाही. यावरून अजय सोशल मीडियावर ट्रोलही झाला. पण आता एका कॅन्सरपीडित चाहत्याने एक पाऊल पुढे जात, अजयला या जाहिराती न करण्याची विनंती केली आहे.राजस्थानमध्ये राहणा-या या कॅन्सर पीडित चाहत्याचे नाव नानकराम आहे. तो ४० वर्षांचा आहे. नानकरामने अजयला तंबाखूच्या जाहिराती न करण्याची जाहीर विनंती केली आहे. नानकरामच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय देवगण जाहिरात करत असलेल्या तंबाखूजन्य पदार्थाचे नानकरामला एकेकाळी व्यसन होते. याचदरम्यान त्याला कॅन्सरने गाठले आणि नानकरामचे डोळे खाडकन उघडले. तंबाखूने आपले व आपल्या कुटुंबाचे आयुष्य उद्धवस्त केले, याची जाणीव त्याला झाली.

कॅन्सरचे निदान होण्यापूर्वी नानकराम चहाचे दुकान चालवायचा. आता तो बोलू शकत नाही. सध्या जयपूरच्या सांगानेर भागात घराघरात दूध विकून तो आपली उपजीविका चालवतो. तंबाखूमुळे कॅन्सर झाल्याचे कळताच नानकरामने स्वखर्चाने तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम सांगणारी एक हजार माहितीपत्रके छापून ती सर्वत्र वाटली. यानंतर त्याने अजयला अशा पदार्थांची जाहिरात न करण्याची विनंती केली. 

नानकराम यांचा मुलगा दिनेश मीणा यानी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, माझे वडिल अजयचे खूप मोठे चाहते आहेत. अजय ज्या ब्रॅण्डची जाहिरात करतो, त्याचेच व्यसन त्यांना लागले. पुढे त्यांना कॅन्सरचे निदान झाले. या आजारानंतर अजय  देवगणसारख्या बड्या अभिनेत्याने तंबाखूजन्य पदार्थाची जाहिरात करू नये, असे त्यांना वाटते.आता अजय आपल्या या चाहत्याची विनंती किती मनावर घेतो, ते बघूच.

टॅग्स :अजय देवगण