Join us  

'बंटी और बबली २'च्‍या गाण्‍याच्‍या शूटिंगपूर्ण, सुरक्षितपणे शूटिंग करतेवेळी नियमांचेही होते कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 5:10 PM

टीमने सर्व कलाकार आणि समूहाला शूटिंग सुरू होण्‍यापूर्वी क्‍वारंटाइन प्रक्रियांचे पालन करण्‍यास सांगितले. ज्‍यामुळे सेट प्रत्‍येकासाठी सुरक्षित शूटिंग क्षेत्र बनले.

 'बंटी और बबली २'चे कलाकार सैफ अली खान, राणी मुखर्जी, सिद्धांत चतुर्वेदी आणि नवोदित अभिनेत्री शर्वरी यांनी चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. आणि त्‍यांनी यश राज फिल्‍म्‍स स्‍टुडिओजमध्‍ये मजेशीर, मनोरंजनपूर्ण गाण्‍याचे शूटिंग करत दिमाखात त्याची सांगता केली. कोरोना विषाणू महामारीच्‍या प्रादुर्भावादरम्‍यान शूटिंग करताना वायआरएफने सर्व सुरक्षितताविषयक उपायांचे काटेकोरपणे पालन करण्‍याची खात्री दिली होती. प्रॉडक्‍शन हाऊसने देखील प्रत्‍येकाची आवश्‍यक सर्व आरोग्‍य तपासणी करण्‍याची, वैद्यकीय कर्मचारी सेटवर उपस्थित असण्‍याची खात्री घेतली. तसेच टीमने सर्व कलाकार आणि समूहाला शूटिंग सुरू होण्‍यापूर्वी क्‍वारंटाइन प्रक्रियांचे पालन करण्‍यास सांगितले. ज्‍यामुळे सेट प्रत्‍येकासाठी सुरक्षित शूटिंग क्षेत्र बनले.

दिग्‍दर्शक वरूण शर्मा म्‍हणाले, ''आम्‍ही सुरक्षित शूटिंग वातावरण असण्‍याच्‍या खात्रीसाठी सर्व शक्‍य मेहनत घेतली. आम्‍हाला आनंद होत आहे की 'बंटी और बबली २'च्‍या सेटवर कोणतीच अनुचित घटना घडली नाही. संपूर्ण टीमसह सर्व कलाकारांच्‍या शूटिंगपूर्वी कोरोनाविषाणू चाचण्‍या करण्‍यात आल्‍या आणि त्‍यानंतर टीमला हॉटेल्‍समध्‍ये क्‍वारंटाइन करण्‍यात आले. ज्‍यामुळे ते सुरक्षित राहिले आणि त्‍यांना विषाणूची लागण झाली नाही. कलाकार घरीच क्‍वारंटाइन झाले आणि शूटिंगदरम्‍यान एकमेकांना भेटले नाहीत. वायआरएफने टीम सदस्‍यांच्या हॉटेलपासून सेटपर्यंत आणि पुन्‍हा सेटपासून हॉटेलपर्यंत परिवहनाची सुविधा केली होती. या कार्स व वाहनांच्‍या ड्रायव्‍हर्सच्‍या देखील चाचण्‍या करण्‍यात आल्‍या आणि त्‍यांना टीमसोबतच क्‍वारंटाइन करण्‍यात आले. म्‍हणून आम्‍ही उच्‍च सुरक्षितताविषयक उपायांचे पालन करत काम केले. हा अनपेक्षित काळ आहे आणि आपल्‍याला आरोग्‍यविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्‍यक आहे. ज्‍यामुळे चित्रपटसृष्‍टी पुन्‍हा एकदा कार्यरत होऊ शकेल. सर्वकाही सुरळीत पार पडल्‍यामुळे मी सर्वांचे आभार मानतो. यामधून संपूर्ण चित्रपटसृष्‍टीला शूटिंगवर परतण्‍यास आत्‍मविश्‍वास मिळेल.''

सैफ म्‍हणाला, ''वायआरएफने घेतलेल्‍या कडक सुरक्षितताविषयक उपायांमुळे आम्‍ही सेटवर खूप धमाल केली.हा अत्‍यंत संवेदनशील काळ आहे आणि कलाकार, निर्माते, टीम व प्रत्‍येकाला धोक्‍याचे वातावरण असल्‍यामुळे अधिक काळजी घ्‍यावी लागणार आहे. आम्‍हाला शूटिंगचा सर्वोत्तम अनुभव मिळण्‍यासाठी घेण्‍यात आलेल्‍या उपाययोजना पाहून मी भारावून गेलो. घरच्‍यापेक्षाही सेटवर अधिक सुरक्षित वाटले. मी आशा करतो की, चित्रपटसृष्‍टीतील प्रत्‍येकजण आदित्‍य चोप्राप्रमाणे अधिक काळजी व दक्षता बाळगतील. संपूर्ण टीम सेटवर असताना आम्‍हाला खात्री होती की, आम्‍हाला विषाणूची लागण होणार नाही आणि यामधून खूपच चांगले वाटले. ज्‍यामुळे शूटिंग अधिक धमालपूर्ण झाली. बीबी२ टीममधील सदस्‍य अनेक महिन्‍यांनंतर एकमेकांना भेटत होते आणि आम्‍ही एकमेकांना भेटण्‍याचा, एकमेकांसोबत असण्‍याचा आणि शूटिंगचा खूप आनंद घेतला.''

'बंटी और बबली २'मध्‍ये नवीन प्रतिभावान कलाकार नवीन जोडीच्‍या रूपात पाहायला मिळणार आहेत. 'गल्‍ली बॉय' चित्रपटामध्‍ये एलानसह एमसी शेरची भूमिका साकारलेला सिद्धांत चतुर्वेदी नवीन बंटीची भूमिका साकारताना दिसणार आहे आणि वायआरएफ या फ्रँचायझीमध्‍ये नवीन अभिनेत्रीला सादर करत आहे. अत्‍यंत मोहक अभिनेत्री शर्वरी बबलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. वायआरएफने दोन वर्षांपूर्वी या अभिनेत्रीला प्रकाशझोतात आणले होते आणि तेव्‍हापासून ती प्रगतीच्‍या दिशेने वाटचाल करत आहे.  

चित्रपटामध्‍ये एका आकर्षक जोडप्‍याच्‍या भूमिकेत सैफ अली खान व राणी मुखर्जी पुन्‍हा एकत्र काम करत आहेत आणि चित्रपटामध्‍ये ते खरे बंटी और बबली असणार आहे. सैफ व राणी यांची जोडी ब्‍लॉकबस्‍टर ठरली होती. त्‍यांनी 'हम तुम', 'ता रा रम पम' सारख्‍या सुपरहिट चित्रपटांमध्‍ये एकत्र काम केले आहे आणि त्‍यांच्‍यामधील केमिस्‍ट्री पाहण्‍यासारखी असून ही जोडी खूपच लोकप्रिय ठरली आहे.

 

राणी म्‍हणाली, ''आम्‍ही हा सीक्‍वेन्‍स महामारीदरम्‍यान शूट केला आणि शूटिंग सुरू होण्‍यापूर्वी वायआरएफने घेतलेल्‍या सर्व आवश्‍यक खबरदारींमुळे आम्‍हाला सेटवर आरामदायी वाटले. आम्‍हाला सर्वांना खात्री होती की, टीममधील सर्व सदस्‍यांसह कोणत्‍याच कलाकाराला विषाणूची लागण नव्‍हती. हा महत्त्वाचा टप्‍पा होता, ज्‍यामधून सुलभ व तणावमुक्‍त शूटिंगचा अुनभव मिळाला आहे. आम्‍ही एकमेकांसोबत शूटिंग करताना खूप धमाल केली. यामधून महामारीपूर्वीच्‍या आमच्‍या शूटिंगच्‍या अनेक आठवणी ताज्‍या झाल्‍या. संपूर्ण टीमने नृत्‍यामधून हा आनंद व्‍यक्‍त केला.''   

सिद्धांत म्‍हणाला, ''पुन्‍हा सेटवर शूटिंग सुरू झाल्‍याने खूपच चांगले वाटले. मला माझी बीबी२ टीम आवडते आणि संपूर्ण टीमची खूप आठवण येत होती. महामारीपूर्वी आम्‍ही शूटिंग करताना खूप धमाल केली आणि त्‍यानंतर आम्‍ही शूटिंग करू शकलो नाही किंवा एकमेकांना भेटू शकलो नाही. मला आनंद होत आहे की, वायआरएफने केलेल्‍या सुरक्षितताविषयक उपायांमुळे शूटिंग सुरक्षित व मजेशीर होऊ शकली. शर्वरी, सैफ सर, राणी मॅडम आणि चित्रपटाच्‍या संपूर्ण टीमला भेटून खूप आनंद झाला. ही टीम खूपच खास आहे आणि आम्‍ही शूटिंग करताना व बीबी२ चे चित्रीकरण पूर्ण करताना खूप धमाल केली.''

शर्वरी म्‍हणाली, ''मी पुन्‍हा संपूर्ण बीबी२ टीमला भेटण्‍यासाठी खूपच उत्‍सुक होते. बीबी२ हा माझा पहिला चित्रपट आहे आणि माझ्या पदार्पणीय चित्रपटाच्‍या टीमचे माझ्या मनात नेहमीच विशेष स्‍थान असणार आहे. मला संपूर्ण टीमची खूप आठवण आली आणि मी चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्‍याची व त्‍यांना भेटण्‍याची वाट पाहत होते. अगदी धमाल वातावरणात आम्‍ही मजेशीर गाण्‍याचे शूटिंग करत चित्रीकरण पूर्ण केले. संपूर्ण टीमला पुन्‍हा भेटून अनेक सकारात्‍मकता, आनंद व विलक्षणतेचा अनुभव घेण्‍यासारखा दुसरा आनंद नाही. अशा मोठ्या टीमसोबत देखील सुरक्षितपणे शूटिंग करण्‍याचा अनुभव मिळाला. आम्‍हाला माहित होते की, सर्वांच्‍या सुरक्षिततेसाठी आवश्‍यक सर्व उपाय करण्‍यात आले होते.''

आदित्‍य चोप्रा निर्मित 'बंटी और बबली २' हा अत्‍यंत मनोरंजनपूर्ण चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्‍दर्शन पदार्पणीय दिग्‍दर्शक वरूण व्‍ही. शर्मा यांनी केले आहे, ज्‍यांनी वायआरएफचे ब्‍लॉकबस्‍टर चित्रपट 'सुल्‍तान' व 'टायगर जिंदा है' साठी सहाय्यक दिग्‍दर्शक म्‍हणून काम केले होते.

टॅग्स :सैफ अली खान राणी मुखर्जी