Join us

BOX OFFICE : अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर या जोडीची चालली जादू; पहिल्याच दिवशी कमाविले इतके कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2018 19:06 IST

महानायक अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘१०२ नॉट आउट’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी धमाकेदार सुरुवात केली.

महानायक अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांच्या बहुप्रतिक्षित ‘१०२ नॉट आउट’ हा फोटो काल प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे पोस्टर्स आणि ट्रेलर बघून सुरुवातीलाच हा अंदाज लावला जात होता की, प्रेक्षकांना काहीतरी हटके बघावयास मिळणार आहे. त्यामुळे लोकांना चित्रपटाविषयी प्रचंड आतुरता होती. दरम्यान, प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची अपेक्षा काहीशी पूर्ण होताना दिसत आहे. कारण चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स आॅफिसवर धमाकेदार सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या दिवसांमध्ये बिग बी आणि चिंटू अंकलची जादू प्रेक्षकांवर कितपत प्रभाव टाकणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  दरम्यान, ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनची माहिती शेअर करताना म्हटले की, ‘एखाद्या फॅमिली चित्रपटाप्रमाणे ‘१०२ नॉट आउट’ या चित्रपटाने सकाळच्या सत्रात संथगतीने सुरुवात केली. परंतु सायंकाळ होताच चित्रपटाने आपला जलवा दाखविण्यास सुरुवात केली. तरणने सांगितले की, ‘या चित्रपटाने भारतात पहिल्याच दिवशी ३.५२ कोटी रुपयांची कमाई केली. यावेळी तरणने हे भाकीतदेखील वर्तविले की शनिवारी, रविवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे. चित्रपटाच्या कथेविषयी सांगायचे झाल्यास, बाप-मुलाचे नाते चित्रपटात अतिशय सुरेख पद्धतीने दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वडिलांच्या भूमिकेत अमिताभ बच्चन असून, मुलाची भूमिका ऋषी कपूर यांनी साकारली आहे. एकीकडे वडील आपले अखेरचे दिवस अतिशय आनंदाने घालवू इच्छितात तर दुसरीकडे मुलगा प्रत्येक पाऊल अतिशय सावधपणे टाकणे पसंत करतो. या चित्रपटाच्या माध्यमातून अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर तब्बल २७ वर्षांनंतर एकत्र झळकले आहेत. अखेरीस या दोघांना ‘अजूबा’ या चित्रपटात बघण्यात आले होते.