Join us  

‘त्याच त्या भूमिकांचा मला कंटाळा; भूमिकांमध्येही नाविण्य शोधतो’ -अभिनेता संजय मिश्रा

By अबोली कुलकर्णी | Published: December 19, 2018 2:52 PM

‘मसान’,‘दिलवाले’,‘गोलमाल’, ‘बागी’,‘धम्माल’ अशा अनेक विनोदी, गंभीर चित्रपटांमध्ये त्यांनी अत्यंत उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. आता ते लवकरच ‘जबरिया जोडी’ या हिंदी चित्रपटात परिणीती चोप्राच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

अबोली कुलकर्णी                                 कधी गंभीर तर कधी विनोदी भूमिका करून हसवणारे, विचार करायला भाग पाडणारे अभिनेते संजय मिश्रा यांनी आजवर अनेक चित्रपटांत भूमिका साकारल्या. ‘मसान’,‘दिलवाले’,‘गोलमाल’, ‘बागी’,‘धम्माल’ अशा अनेक विनोदी, गंभीर चित्रपटांमध्ये त्यांनी अत्यंत उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. आता ते लवकरच ‘जबरिया जोडी’ या हिंदी चित्रपटात परिणीती चोप्राच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा संवाद...                              

* ‘जबरीया जोडी’ चित्रपटातील तुमच्या भूमिकेविषयी काय सांगाल?  - या चित्रपटाची कथा ही एका छोटयाशा गावातील मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती फिरणारी आहे. मी परिणीतीच्या वडिलांची भूमिका साकारत आहे.  ते सगळयाच मध्यमवर्गीय वडिलांसारखे असतात. अभिनयामुळे वेगवेगळी आयुष्य जगायला मिळतात याचा मला प्रचंड आनंद आहे.                                                                                                               

* आत्तापर्यंत तुम्ही अनेक विनोदी आणि गंभीर प्रकारच्या भूमिका  केल्या आहेत. प्रेक्षकांना  हसवणं किती कठीण असतं?  - खरंतर प्रेक्षकांना हसवणं कठीण नाही. पण, कलाकाराला कळालं पाहिजे की, आपण कोणत्या परिस्थितीत कसं बोललं आणि वागलं पाहिजे. मी क ाही स्टँड अप कॉमेडियन नाही की, जो असा विचार करेल की, आता प्रेक्षकांना हसवायचं कसं? मात्र, मला एक कलाकार म्हणून जो सीन दिला आहे, त्यात काम करून मी कसं प्रेक्षकांना हसवलं पाहिजे ? हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे.                                        

* तुम्ही एखादा प्रोजेक्ट मिळवताना कोणत्या बाबींचा विचार करता?  - मी दिग्दर्शक, सहकलाकार यांच्यासोबत काम करताना शूटिंगच्या ठिकाणांचाही विचार करतो. त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे माझी भूमिका. कारण मला त्याच त्या भूमिका करणं आवडत नाही. मला भूमिकांमध्ये असलेले नाविण्य एन्जॉय करायचे असते. नवनवीन प्रयोग मला या भूमिकांसोबतच करायचे असतात.                                                                                                                                                                                                                         

* तुम्ही १९९५ मध्ये ‘ओह डार्लिंग, यह हैं इंडिया’ या चित्रपटातून इंडस्ट्रीत डेब्यू केला आहे. तेव्हाची इंडस्ट्री आणि आज किती बदल झाला आहे?- खरं सांगायचं तर, प्रचंड बदल घडून आला आहे. आम्हाला सुरूवातीच्या काळात एक सीन करायचा म्हटला की, खूप कष्ट घ्यावे लागायचे. पुन्हा पुन्हा  रिटेक व्हायचे नाहीत. आता मात्र तसे होत नाही. टेक्नोलॉजी आता एवढी व्यापक झाली आहे की, कलाकार १४ - १५ वेळेस रिटेक्स घेतात. त्यामुळे पूर्वीच्या काळी कलाकारांना एकाच शॉटमध्ये सीन चित्रीत करण्याचं प्रचंड टेन्शन असायचं.

* तुम्ही छोटया पडद्यावरही काम केले आहे. कोणता फरक जाणवतो?  - छोटा पडदा आणि मोठा पडदा यांच्यात  बराच फरक आहे. छोटया पडद्यासाठी काम करत असताना कमी वेळेत शूटिंग करण्याचं मोठं आव्हान असतं. मात्र, चित्रपटाच्या बाबतीत तसं होत नाही. चित्रपटाच्या शूटिंगसाठी थोडा जास्त वेळ खर्च करावा लागतो. 

टॅग्स :परिणीती चोप्रा