Join us  

या गायिकेचे वडील कॉलेजच्याबाहेर विकायचे समोसे, आज ती कमावते करोडो रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 1:33 PM

या गायिकेने एकाहून एक हिट गाणी गायली आहेत. आजच्या आघाडीच्या गायिकांमध्ये तिची गणना केली जाते.

ठळक मुद्देनेहा एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आली आहे. तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती. तिच्या वडिलांनी अतिशय छोटी कामं करून घर चालवलं आहे.

गायिका नेहा कक्करने आपल्या सुरेल स्वरांनी अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. चित्रपटातील गाण्यांपासून स्टेज शोपर्यंत प्रत्येक ठिकाणी नेहा कक्कडला खूप डिमांड आहे. मात्र तिच्यासाठी हा प्रवास सोप्पा नव्हता. नेहा कक्करने इतर लोकांप्रमाणे लाइन लावून इंडियन आयडॉलचे ऑडिशन दिले होते. नेहाने तिच्या मेहनतीच्या जोरावर आाज बॉलिवूडमध्ये नाव कमावले आहे. नेहा कक्करने तिच्या आयुष्यात प्रचंड संघर्ष केला आहे. 

नेहा एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आली आहे. तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती. तिच्या वडिलांनी अतिशय छोटी कामं करून घर चालवलं आहे. तिचे वडील तिच्या बहिणीच्या म्हणजेच सोनूच्या कॉलेजच्याबाहेर समोसे आणि चहा विकायचे. त्यामुळे तिच्या बहिणीला कॉलेजमधील मुलं चिडवायची. 

दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात ६ जून १९८८ ला नेहाचा जन्म झाला. नेहा प्रमाणेच तिची बहीण सोनू देखील गायक असून त्या दोघी सुरुवातीला देवीच्या जागरणामध्ये भजनं गायच्या. यासाठी तिला केवळ ५०० रुपये मिळायचे. आँख मारे, माही वे, मिले हो तुम, बदरी की दुल्हनियाँ, मैं तेरा बॉयफ्रेंड, काला चष्मा ही तिची अनेक गाणी प्रचंड गाजली आहेत. इंडियन आयडलची एक स्पर्धक ते परीक्षक हा तिचा प्रवास थक्क करणारा आहे. ज्या कार्यक्रमाने आपल्याला एक ओळख मिळवून दिली, त्याच कार्यक्रमात इतकी महत्त्वाची भूमिका बजावायला नेहाला मिळाली.

नेहा कक्करने आपल्या करिअरची सुरुवात इंडियन आयडल या रिऑलिटी शोद्वारे केली. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनमध्ये ती एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. त्यावेळी ती केवळ अकरावीत शिकत होती. या कार्यक्रमाचे तिला विजेतेपद मिळवता आले नसले तरी या कार्यक्रमामुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. बॉलिवूडमध्ये एक गायिका म्हणून आपले प्रस्थ निर्माण केल्यानंतर सारेगमपा या रिअ‍ॅलिटी शोमध्ये ती परीक्षकाच्या भूमिकेत दिसली आणि त्यानंतर तिने इंडियन आयडलमध्ये परीक्षकाची भूमिका बजावली.  

टॅग्स :नेहा कक्कर