Join us  

पद्मिनी कोल्हापुरेंनी सगळ्यांसमोर लगावली ऋषी कपूरच्या कानशिलात; 'प्रेम रोग'च्या सेटवर घडला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 7:37 PM

Padmani kolhapure: पद्मिनी कोल्हापुरेंनी जवळपास ७-८ वेळा ऋषी कपूरवर हात उचलला.

बॉलिवूडमध्ये घडत असलेल्या किस्स्यांविषयी, घटनांविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. यात खासकरुन एखाद्या सिनेमाच्या सेटवरील जुना किस्सा वा कलाकारांचे अनुभव असतील तर प्रेक्षक मोठ्या कुतूहलाने ते ऐकतात. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे (padmani kolhapure) आणि ऋषी कपूर (rishi kapoor) यांचा असाच एक किस्सा चर्चिला जात आहे. ९० च्या काळात तुफान गाजलेल्या प्रेम रोग या सिनेमाच्या सेटवर पद्मिनी कोल्हापुरे यांनी ऋषी कपूर यांच्या तब्बल ८ वेळा कानशिला लगावली होती. याविषयी त्यांनी स्वत: एका मुलाखतीत खुलासा केला.

१९८२ साली प्रदर्शित झालेला 'प्रेम रोग' (prem rog) हा चित्रपट साऱ्यांनाच ठावूक आहे. या चित्रपटात ऋषी कपूर यांनी देव ही भूमिका साकारली होती. तर, पद्मिनीने मनोरमा या विधवेची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे या चित्रपटातील एका सीनमध्ये पद्मिनी यांनी ऋषी कपूरच्या कानशिलात लगावायची होती. मात्र, ऋषी कपूरसारख्या दिग्गज कलाकारावर हात उचलणं त्यांना शक्य नव्हतं. त्यामुळे त्या वारंवार नकार देत होत्या. मात्र, हा सीन परफेक्ट करायचा असेल तर तुला मारावंच लागेल, असं दिग्दर्शकांनी सांगितलं होतं. त्यामुळे पद्मिनी कोल्हापुरे यांना ऋषी कपूरवर हात उचलावा लागला. विशेष म्हणजे त्यांना मारणं पद्मिनी यांना योग्य वाटत नव्हतं त्यामुळे त्यांना वारंवार रिटेक घ्यावा लागत होता. यामध्येच त्यांनी जवळपास ७-८ वेळा ऋषी कपूरवर हात उचलला.

"या चित्रपटात एका सीनमध्ये मला ऋषी कपूर यांच्या कानशिलात लगावायची होती. पण, ऋषी कपूर यांच्या गालाजवळ हात गेल्यानंतर माझा हात आपोआप थांबतो हे मी शुटिंगच्या पहिल्याच दिवशी सांगितलं होतं. परंतु, दिग्दर्शक राज कपूर यांनी मला ऋषी यांच्या कानाखाली जोरदार मारायला सांगितली होती. हा सीन खरा वाटावा यासाठी त्यांनी मला खरोखर ऋषी यांना मारायला सांगितलं होतं. त्यावेळी चिंटूनेही (ऋषी कपूर) मला सांगितलं की तू बिनधास्त मला जोरात कानफटात मार", असं पद्मिनी कोल्हापुरे म्हणाल्या.

पुढे त्या म्हणतात, "पहिल्या टेकच्या वेळी मी वेगाने हात उचचला पण ऋषीच्या कानाजवळ जाताच माझा हात थांबला. हा टेक राज कपूर यांना पटला नाही. मग पुन्हा त्यांनी माझ्याकडून ७-८ वेळा हा सीन करुन घेतला. यावेळी कॅमेरा इश्शू, टेक्निकल इश्शू असे बरेच अडथळे आल्यामुळे ऋषीला जवळपास ८ वेळा माझ्या हातचा मार खावा लागला."

दरम्यान, या सीनसाठी ऋषी कपूर यांना भलेही पद्मिनीच्या हातचा मार खावा लागला असला तरीदेखील हा चित्रपट तुफान सुपरहिट झाला. या चित्रपटात शम्मी कपूर, नंदा, तनुजा, सुषमा सेठ,  कुलभूषण खरबंदा, रजा मुराद, ओम प्रकाश, बिंदू हे कलाकार झळकले होते. 

टॅग्स :पद्मिनी कोल्हापुरेऋषी कपूरसेलिब्रिटीबॉलिवूड