Join us  

व्यसनाच्या आहारी गेल्याने ओढवला 'या' कलाकारांचा मृत्यू?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 9:00 PM

बॉलिवूडमधील अनेक कलाकार व्यसनाच्या आहारी गेल्याने त्यांच्या वाट्याला केवळ दुःख आले आहे. एवढेच नव्हे तर या व्यसनामुळेच अनेकांचा मृत्यू देखील झालेला आहे. 

ठळक मुद्देदिव्याचे वयाच्या १९ व्या वर्षी घरातील बाल्कनीतून पडून निधन झाले. त्यावेळी देखील तिने मोठ्या प्रमाणात मद्याचे सेवन केले असल्याचे म्हटले जाते.

बॉलिवूडमधील अनेक कलाकार हे व्यसनांच्या आहारी गेले असल्याचे आपल्याला अनेकवेळा वाचायला मिळते. फिल्मी पार्ट्यांमध्ये तर सर्रास दारूचे सेवन मोठ्या प्रमाणावर केले जाते. बॉलिवूडमधील अनेक कलाकार व्यसनाच्या आहारी गेल्याने त्यांच्या वाट्याला केवळ दुःख आले आहे. एवढेच नव्हे तर या व्यसनामुळेच अनेकांचा मृत्यू देखील झालेला आहे. 

दिव्या भारतीदिव्या भारतीने खूपच कमी वयात बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले होते. तिच्या दिल का क्या कसूर, शोला और शबनम, दिवाना, दिल आशना है, रंग यांसारख्या अनेक चित्रपटांना प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले. दिव्याला दारूचे प्रचंड व्यसन होते. तिचे वयाच्या १९ व्या वर्षी घरातील बाल्कनीतून पडून निधन झाले. त्यावेळी देखील तिने मोठ्या प्रमाणात मद्याचे सेवन केले असल्याचे म्हटले जाते.

गुरू दत्तगुरू दत्त यांनी एकेकाळी चित्रपटसृष्टी गाजवली होती असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. त्यांच्या प्यासा, कागज के फूल, साहेब बिवी और गुलाम, चौधरी का चाँद यांसारख्या चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. गुरू दत्त व्यवसायिक आयुष्याइतकेच त्यांच्या खाजगी आयुष्यासाठी नेहमीच चर्चेत राहिले. त्यांचे लग्न गीता दत्त यांच्यासोबत झालेले असताना देखील ते अभिनेत्री वहिदा रहमान यांच्या प्रेमात पडले होते. त्या दोघांच्या नात्याची नेहमीच चर्चा होत असे. आपल्या खाजगी आयुष्यात सुरू असलेल्या उतार-चढावांमुळे ते दारू आणि सिगारेट यांसारख्या व्यसनांच्या आहारी गेले. त्यांची पत्नी गीता दत्त यांना त्यांचे आणि वहिदा यांचे प्रकरण कळल्यावर त्यांनी त्यांच्यापासून वेगळे व्हायचा निर्णय घेतला होता. वयाच्या ३९ व्या वर्षी खाजगी आयुष्यातील या धक्क्यानंतर त्यांनी आत्महत्या केली.

संजीव कुमारसंजीव कुमार हे खूप चांगले अभिनेते होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या. त्यांना दारूचे प्रचंड व्यसन होते. संजीव हे त्यांच्या अभिनय कारकिर्दीत यश मिळवत असले तरी त्यांना खाजगी आयुष्यात समाधान नव्हते. त्यांचे अभिनेत्री हेमा मालिनीवर प्रेम होते. पण हेमा मालिनी यांचे धर्मेंद्र यांच्यावर प्रेम होते आणि त्यांनी काहीच वर्षांच्या अफेअरनंतर त्यांच्यासोबत लग्न केले. त्यामुळे संजीव यांना चांगलाच धक्का बसला होता. संजीव यांचे केवळ वयाच्या ४७ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

परवीन बाबी परवीन बाबीने ऐंशीचा काळ गाजवला होता असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. परवीनने त्या काळात अनेक आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केले होते. त्यांच्या सौंदर्यावर, अभिनयावर त्यांचे फॅन्स फिदा होते. त्यांच्या खाजगी आयुष्यातील काही समस्यांमुळे त्या दारू आणि अमली पदार्थांच्या आहारी गेल्या होत्या. त्या उतारवयात अतिशय एकाकी जीवन जगत होत्या. त्या घरात एकट्याच असताना त्यांचे निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या मृत्युची बातमी कित्येक दिवसांनंतर लोकांना कळली होती.

बेगम अख्तरबेगम अख्तर यांच्या गजल आजही आपल्या चांगल्याच लक्षात आहेत. त्या एकटेपणाला प्रचंड घाबरत असल्याने त्या दारूच्या आहारी गेल्या होत्या. याचमुळे त्यांना फुफ्फुसांच्या संबंधीचे आजार उद्भवले आणि त्यातच त्यांचे निधन झाले. 

मीना कुमारी

मीना कुमारी यांनी पाकिजा, दिल अपना प्रीत पराई, मेरे अपने यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या. मीना कुमारी या त्याकाळच्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असल्या तरी त्यांच्या खाजगी आयुष्यात सगळे काही सुरळीत नव्हते आणि याचमुळे त्यांना दारूचे व्यसन लागले. दारूच्या आहारी गेल्यानेच त्यांचे निधन झाले. 

टॅग्स :दिव्या भारतीपरवीन बाबीगुरू दत्तसंजीव कुमारमीना कुमारी