Join us  

रावण खलनायक नव्हता, म्हणणाऱ्या सैफ अली खानवर भडकले राम कदम; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2020 1:35 PM

हिंदू भावना दुखावल्यास सहन करणार नाही...

ठळक मुद्दे    ‘आदिपुरुष’ या सिनेमात साऊथ सुपरस्टार प्रभास प्रभु रामचंद्राच्या भूमिकेत दिसणार आहे.  

‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ या सिनेमात नकारात्मक भूमिका साकारणारा अभिनेता सैफ अली खान पुन्हा एकदा अशाच एका भूमिकेसाठी तयार आहे. होय, ‘तान्हाजी’चा दिग्दर्शक ओम राऊत लवकरच ‘आदिपुरूष’ हा सिनेमा घेऊन येतोय आणि यात सैफ लंकेश रावणाची भूमिका साकारताना दिसणार आहे. पण तूर्तास, या भूमिकेसंदर्भात सैफने केलेले एक विधान त्याच्या अंगलट आल्याचे चित्र आहे. भाजपा आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांनी यानिमित्ताने सैफला कडक शब्दांत इशारा दिला आहे. हिंदू भावना दुखावल्यास सहन करणार नाही,असे राम कदम यांनी म्हटले आहे.

काय म्हणाला होता सैफअलीकडेच मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खान ‘आदिपुरुष’ मधील आपल्या भूमिकेबद्दल बोलता होता.  ‘आदिपुरुष’या चित्रपटात लंकेशची व्यक्तिरेखा वाईट नसून मनोरंजक आहे. आम्ही ती अतिशय मनोरंजक पद्धतीने सादर करणार आहोत. रावणाने केलेल्या सीता हरणालाही आम्ही न्यायसंगत दाखवणार आहोत. रावणाला आपण आजपर्यंत खलनायकाच्या भूमिकेत पाहिले. पण तो खलनायक नव्हतो. तो देखील एक माणूस होता. रामासोबतचे त्याचे युद्ध ही सूडाची कहाणी असल्याचे आम्ही दाखवणार आहोत. जे लक्ष्मणाने रावणाची बहिण शुर्पणखाचे नाक कापल्यामुळे सुरू झाले होते, असे सैफ या मुलाखतीत म्हणाला होता. त्याच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.  बॉयकॉट आदिपुरूष, वेकअप ओमराऊत असे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. अनेकांनी सैफला सिनेमातून काढून टाकण्याची मागणीही केली आहे.

काय म्हणाले राम कदम

सैफच्या या वक्तव्याचा राम कदम यांनी तिखट शब्दांत समाचार घेतला. ‘आदिपुरूष या सिनेमात सैफ अली खान रावणाची भूमिका साकारतो आहे. रावणाच्या भूमिकेला हिरोसारखे निभवेल, असे ते म्हणत आहेत. लक्ष्मणाने रावणाच्या बहिणेचे नाक कापले त्यामुळे रावणाने सीतामातेचे अपहरण केले, प्रभु रामचंद्रासोबत युद्ध केले, असे सैफ म्हणत आहेत. सैफ रावणाच्या दृष्कृत्याला न्याय देण्याची भाषा करत असतील त्याचे समर्थन कसे होईल?  प्रभू रामचंद्रांनी धर्म स्थापित केला, आमची आस्था आणि श्रद्धा आहे. राम आणि रावणाची लढाई ही धर्म -अधर्म यांची लढाई आहे. आता ते अधर्माला योग्य ठरवत आहेत. निर्माता आणि दिग्दर्शकाने हिंदूंच्या आस्थांचा आदर करत सिनेमा बनवावा. ओम राऊत यांनी याआधी ‘तान्हाजी’ सिनेमा साकारला होता.  त्यामध्ये ज्याप्रकारे हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील मराठ्यांची अस्मिता अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला होता त्याचप्रमाणे या सिनेमातही त्यांना हिंदूंच्या आस्था आणि श्रद्धेचा सन्मान त्यांना करावा लागेल. हिंदू भावना दुखावल्या गेल्यास तेआम्ही  सहन करणार नाही,’ असे राम कदम यांनी  पोस्टमध्ये लिहिले आहे.

#BoycottAdipurush होतोय ट्विटरवर ट्रेंड, सैफ अली खान म्हणतोय - 'रावण नव्हता खलनायक'

 ‘आदिपुरुष’ या सिनेमात साऊथ सुपरस्टार प्रभास प्रभु रामचंद्राच्या भूमिकेत दिसणार आहे.  अद्याप चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झालेले नाही, मात्र 11 आॅगस्ट 2022 रोजी हा चित्रपट रिलीज करण्याची योजना आहे. 

टॅग्स :सैफ अली खान राम कदम