Join us  

ठाऊक असूनही मुलाला आत्महत्या करण्यापासून रोखू शकला नाही कबीर बेदी...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 11:58 AM

मुलाच्या तिरडीला खांदा देण्याची वेळ कुठल्याही बापावर कधी येऊ नये. पण अभिनेता कबीर बेदीच्या आयुष्यात हा दु:खद प्रसंग ओढवला.

ठळक मुद्देकबीर बेदी नेहमीच त्यांच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो.

मुलाच्या तिरडीला खांदा देण्याची वेळ कुठल्याही बापावर कधी येऊ नये. पण अभिनेता कबीर बेदीच्या आयुष्यात हा दु:खद प्रसंग ओढवला. लाख प्रयत्न करूनही कबीर बेदी आपल्या मुलाला आत्महत्या करण्यापासून रोखू शकला नाही. आज कबीर बेदीचा वाढदिवस. त्यानिमित्त त्याच्या खासगी आयुष्यातील ही दु:खद घटना आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.कबीरचा मुलगा सिद्धार्थ बेदी याने वयाच्या 26 वर्षी आत्महत्या केली होती. मुलाच्या मृत्यूचे दु:ख कबीर बेदी आजही विसरू शकलेला नाही. एका मुलाखतीत तो यावर बोलला होता.

कबीर बेदीने सांगितले होते की, ‘माझा मुलगा आत्महत्या करू शकतो, हे मला माहित होते. मी लाख प्रयत्न केलेत. पण त्याला वाचवू शकलो नाही. त्याने इन्फार्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये आॅनर्स केले होते. नंतर मास्टर डिग्रीसाठी तो नॉर्थ कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीत गेला आणि त्याचे आयुष्य बदलले. याठिकाणी का कुणास ठाऊक तो डिप्रेशनमध्ये गेला. त्याचे डिप्रेशन वाढत गेले आणि तो सिजोफ्रेनियासारख्या गंभीर आजाराचा बळी ठरला. मी त्याच्यावर बरेच उपचार केले. पण औषधांनी तो आणखी नैराश्यात ढकलला गेला. मी त्याच्यात सकारात्मक ऊर्जा पेरण्याचेही अतोनात प्रयत्न केलेत. पण त्याचा आजार आटोक्याबाहेर गेला होता. त्याने स्वत: त्याच्या आजाराबद्दलची माहिती गोळा केली होती. या आजाराचे गंभीर परिणाम त्याला ठाऊक होते. मी आत्महत्येबाबत विचार करतोय, हे त्यानेच मला एकदिवस सांगितले आणि मला जबर धक्का बसला. त्याला जेवण आवडायचे नाही. टीव्ही पाहून तो कंटाळायचा. त्याला नोकरीही करायची नव्हती. माझी पत्नी निक्की व मी स्वत: त्याची प्रचंड काळजी घेतली. एक दिवस मी त्याचा मेल वाचला. हा मेल त्याने त्याच्या मित्रांना केला होता. मला फेअरवेल द्यायला या, असे त्याने लिहिले होते. मी घाबरलो.  काहीच दिवसांत त्याने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहिली होती. मी दुस-या जगात जातोय, असे त्याने त्यात लिहिले होते.’

‘खून भरी मांग’ या सिनेमामधील खलनायक किंवा ‘मैं हूँ ना’ मधील जनरल बक्षी म्हणून आपण कबीर बेदीला ओळखतो. अभिनेते, प्रेझेंटर आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून त्याने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कबीर बेदी नेहमीच त्यांच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. त्याने चार लग्नं केलीत.

टॅग्स :कबीर बेदी