Join us  

BirthDay Special : धर्मेन्द्र नाही ‘या’ अभिनेत्यासोबत होणार होते हेमा मालिनी यांचे लग्न!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 9:15 AM

आज(१६ आॅक्टोबर) ड्रिमगर्ल हेमा मालिनी यांचा वाढदिवस. ७०-८० च्या दशकात सगळ्यांची मने जिंकणा-या या अभिनेत्री उण्यापु-या १४ व्या वर्षी आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केली.

आज(१६ आॅक्टोबर) ड्रिमगर्ल हेमा मालिनी यांचा वाढदिवस. ७०-८० च्या दशकात सगळ्यांची मने जिंकणा-या या अभिनेत्री उण्यापु-या १४ व्या वर्षी आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केली. पहिल्या चित्रपटानंतर त्यांच्याकडे दिग्दर्शकांची रांग लागली आणि त्यामुळे मनात असूनही त्या शालेय शिक्षण पूर्ण करू शकल्या नाहीत.हेमा मालिनी यांचा पहिला चित्रपट १९६१ मध्ये रिलीज झाला़ या चित्रपटाचे नाव होते, ‘पांडव वनवासन’. या तेलगू चित्रपटात हेमा यांनी एका नर्तकीची भूमिका साकारली होती. ‘सपनों का सौदागर’ या चित्रपटातून हेमा यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. १९६८ मध्ये आलेल्या या चित्रपटात हेमा मालिनी राज कपूर यांच्या हिरोईन होत्या. यावेळी हेमा मालिनींचे वय होते २० वर्षे आणि राज कपूर त्यांच्यापेक्षा २४ वर्षांनी मोठे होते.

हेमा यांनी अभिनयाशिवाय दिग्दर्शनातही हात आजमावला. ‘दिल आशना है’ या चित्रपटात त्यांनी शाहरूख खानला दिग्दर्शित केले. त्या भरतनाट्यम, कुचीपुडी, ओडिशी अशा नृत्यात पारंगत आहेत. जगभरात त्यांचे स्टेज शो होतात.

हेमा मालिनी व धर्मेन्द्र यांची लव्हस्टोरी सर्वांनच ठाऊक आहे. पण धर्मेन्द्रशिवाय जितेन्द्र आणि संजीव कुमार यांनीही हेमा खूप आवडायच्या. ‘बियॉण्ड द ड्रीम गर्ल’ या त्यांच्या जीवनचरित्रात तर जितेन्द्र व हेमा मालिनी यांचे लग्न होणार होते, याचा एक किस्सा आहे. अर्थात  हे लग्न म्हणजे हेमा मालिनी यांच्यासाठी जबरदस्तीचा मामला होता. कारण हेमा मालिनी तेव्हा धर्मेन्द्र यांच्या प्रेमात आकंठ बुडाल्या होत्या. जितेन्द्र यांना हेमा आवडायच्या. पण हेमा यांनी जितेन्द्र यांना कधीच प्रतिसाद दिला नाही. अखेर हेमा यांनी धर्मेन्द्र यांच्याबद्दल जितेन्द्र यांना सांगितले. यानंतर जितेन्द्र व हेमा यांनी मित्र बनून राहण्याचा निर्णय घेतला. हेमा यांना धर्मेन्द्र यांच्यासोबत लग्न करायचे होते. पण कुटुंबाचा विरोध होता. अखेर कुटुंबीयांनी लवकरात लवकर हेमांचे लग्न उरकून टाकण्याचा निर्णय घेतला. जितेन्द्रचे घर स्थळ यासाठी परफेक्ट होते. कुटुंबीयांचा निर्णय मानून हेमा या लग्नाला होकार दिला. हेमा यांच्याप्रमाणेच जितेन्द्र यांचे हेमावर प्रेम नव्हते. त्यावेळी जितेन्द्र यांचा शोभासोबत (जितेन्द्र यांच्या पत्नी) रोमान्स सुरू होता़ पण हेमांचा स्वभाव पाहून त्यांनीही या लग्नाला होकार कळवला. लग्नात कुठलेही विघ्न नको म्हणून हे लग्न मद्रासला करण्याचे ठरले.

हेमा, जितेन्द्र आणि त्यांचे कुटुंबीय  मद्रासला पोहोचले होते. पण का कशी पण तिथल्या एका वृत्तपत्राला या लग्नाची कुणकुण लागली आणि त्यांनी हे वृत्त प्रसिद्ध केले. या  वृत्ताने अनेकांनाच धक्का बसला. धर्मेन्द्र यांच्यासाठी तर हे सर्व अनपेक्षित होते. ही बातमी धर्मेन्द्र यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी जितेन्द्र यांची तत्कालीन प्रेयसी शोभा सिप्पी यांच्या घराकडे धाव घेतली. त्यानंतर ते दोघेही मद्रासला रवाना झाले. हा सगळा एपिसोड कुठल्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हता. हेमा यांच्या वडिलांनी धर्मेन्द्र यांना पाहून त्यांना अक्षरश: धक्के मारून घराबाहेर काढले.  तुम्ही विवाहित आहात, त्यामुळे तुम्ही माझ्या मुलीसोबत लग्न करु शकत नाही, असे ते वारंवार म्हणत होते. खूप प्रयत्नांती धर्मेन्द्र यांनी हेमा यांच्याशी एकांतात बोलण्याची परवानगी मिळवली. धर्मेन्द्र आणि शोभा दोघंही त्यांचं प्रेम परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते.  धर्मेन्द्र यांच्याशी बोलल्यानंतर हेमा आपल्या खोलीतून बाहेर आल्या आणि त्यांनी घरातल्या मंडळींकडे काही दिवसांचा अवधी मागितला. पण, लग्न होईल तर आत्ताच, नाहीतर कधीच नाही, अशी भूमिका जितेन्द्र आणि त्यांच्या आईवडिलांनी घेतली. सगळ्यांना हेमा यांच्या उत्तराची प्रतीक्षा होती. अखेर हेमामालिनी यांनी नकारार्थी मान हलवली आणि जितेन्द्रसोबतचं त्यांचे लग्न तुटले. जितेन्द्र यांना हा अपमान सहन झाला नाही. ते तडक त्या ठिकाणाहून निघून गेले होते. 

टॅग्स :हेमा मालिनी