Join us  

Birth Anniversary : नर्गिस यांनी केला होता आत्महत्येचा प्रयत्न, वाचा काय होते कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 11:23 AM

आपल्या अदांनी लाखो लोकांचे मन जिंकणा-या नर्गिस दत्त यांचा जन्म 1 जून रोजी झाला होता.

ठळक मुद्देनर्गिस यांचं बॉलिवूड करिअर सुरू झाले. मात्र 1950 ते 1954 हा काळ त्यांच्यासाठी सर्वाधिक कठीण होता.

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस दत्त यांची आज जयंती. आज नर्गिस आपल्यात नाहीत. पण त्यांच्या आठवणी, त्यांनी पडद्यावर साकारलेल्या भूमिका या रूपात त्या कायम आपल्यासोबत असतील. नर्गिस यांचे फिल्मी करिअर फार मोठे नव्हते. पण या लहानशा करिअरमध्येही त्यांनी अनेक यादगार भूमिका साकारल्या आणि 1940 ते 1960 या काळात बॉलिवूडच्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री बनल्या.

नर्गिस यांचे खरे नाव कनीज फातिमा राशिद होते. खरे सांगायचे तर नर्गिस यांना अभिनयात अजिबात रस नव्हता. एक दिवस त्यांच्या आईने त्यांना स्क्रीन टेस्टसाठी दिग्दर्शक महबूब खानकडे यांच्याकडे पाठवले. आईला नकार देण्याचे धाडस नव्हते आणि स्क्रीन टेस्ट द्यायची इच्छा नव्हती. आपण स्क्रीन टेस्टमध्ये फेल झालो तर सगळे आपले मनासारखे होईल. अभिनेत्री व्हावे लागणार नाही, असा विचार करून नर्गिस स्क्रीन टेस्टसाठी गेल्या. मग काय, मनात येईल तसे संवाद म्हटले. महबूब खान आता आपल्याला हाकलून देतील आणि आपण सुटू असा त्यांचा इरादा होता. पण सगळेच फसले. फेल करण्याऐवजी महबूब खान यांनी  ‘तकदीर’ सिनेमासाठी त्यांची निवड केली.

नर्गिस यांचं बॉलिवूड करिअर सुरू झाले. मात्र 1950 ते 1954 हा काळ त्यांच्यासाठी सर्वाधिक कठीण होता. या काळात रिलीज झालेले त्यांचे सिनेमे फ्लॉप ठरले. पण 1955 मध्ये आलेला ‘श्री 420’ हा राज कपूर यांच्यासोबतचा त्यांचा सिनेमा सुपरहिट ठरला.   त्यांनी राज कपूर यांच्यासोबत  बरसात, अंदाज,जान-पहचान, प्यार,आवारा अनहोनी,  आशियाना,आह, धुन, पापी', चोरी चोरी अशा अनेक चित्रपटांत काम केले आणि एकत्र काम करता करता नर्गिस व राज कपूर एकमेकांच्या प्रेमात पडले. या प्रेमाच्या चर्चा खूप रंगल्या. पण  प्रत्यक्ष आयुष्यात ही प्रेमकहाणी अधुरी राहिली. अफेअर दीर्घकाळ चालले पण नर्गिस व राज कपूर यांचे लग्न होऊ शकले नाही. पुढे नर्गिस यांनी सुनील दत्त यांच्याशी लग्नगाठ बांधली.

सुनील दत्त यांच्याशी लग्न केल्यानंतर नर्गिस यांचे आयुष्य बदलले. पण याच सुनील दत्त यांच्यामुळे नर्गिस यांनी एकइा आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. होय, इश्वर देसाई यांनी लिहिलेल्या ‘डार्लिंगजी- द ट्रू लव्ह स्टोरी ऑफ नर्गिस अ‍ॅण्ड सुनील दत्त’ या पुस्तकात हा खुलासा करण्यात आला होता.होय, लग्नाआधी नर्गिस यांनी सुनील दत्तला एक लव्ह लेटर लिहिले होते. पण सुनील दत्त यांनी याचे काहीही उत्तर दिले नाही. सुनील आपल्याला टाळत असल्याचे नर्गिस यांना वाटले. आधीच राज कपूर यांच्यासोबतचे नाते तुटल्याने नर्गिस दुखावल्या होत्या. अशात सुनील दत्त यांचे वागणे पाहून त्या आणखी दुखावल्या आणि त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण सुदैवाने त्या यातून बचावल्या.

प्रत्यक्षात सुनील दत्त हे नर्गिस यांचे स्टारडम पाहून संभ्रमात होते. त्यांना नर्गिस यांच्या स्टारडमची भीती वाटत होती. त्यामुळेच त्यांनी त्या पत्राचे उत्तर दिले नव्हते. पण नर्गिस यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पाहून यापुढे अशी चूक कधीही होणार नाही, असे वचन त्यांनी नर्गिस यांना दिले. ते वचन त्यांनी शेवटपर्यंत निभवले.   

टॅग्स :नर्गिस